रत्नागिरी : माध्यमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या संस्कृत शिक्षकांनी योग्य, सुटसुटीत आणि सोप्या संस्कृतचा उपयोग करावा आणि नियमित सरावाने संस्कृत भाषेला आत्मसात करावे. विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांनी संस्कृतचा संस्कार करावा आणि संस्कृतच्या प्रचारासाठी सर्वस्व अर्पणाची भावना ठेवा असे प्रतिपादन पुणे येथील डेक्कन अभिमत विद्यापीठ भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृत विश्वकोष केंद्रातील प्रा. संभाजी पाटील यांनी केले.
संस्कृत कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय, (नवी दिल्ली), गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), माध्यमिक शिक्षण विभाग, जि. प. रत्नागिरी, संस्कृत शिक्षक मंडळाच्या सहयोगाने संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण दोन दिवशीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, फक्त संस्कृत वाचून आणि बोलून चालणार नाही. त्यासोबतच ते तितकेच योग्य व शुद्ध स्वरूपाचे हवे. संस्कृत भाषा आजही समर्पक आहे. ज्याप्रमाणे गीतेत भगवंतानी नवविधा भक्ती सांगितली अगदी त्याप्रमाणे प्रत्येक संस्कृतप्रेमी आणि संस्कृत शिक्षकाने स्वत:कडून जेवढे योगदान या भाषेसाठी देता येईल तेवढे द्यावे.
कार्यशाळेत जिल्हाभरातून संस्कृत भाषेचे शिक्षक सहभागी झाले होते. पहिल्या सत्रात महाबल भट्ट यांनी काळाचा विचार करता संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण देणे का आवश्यक आहे यावर विस्तृत मार्गदर्शन केले. नंतर संस्कृत भाषेतील पद्य, श्लोक, गद्य यासारख्या विविध अध्यापन पद्धतींचा वापर कसा लीलया करावा यावर के.जी.महेश यांनी भर दिला. तसेच, संस्कृत भाषेत शब्दांची अनावश्यक होणारी पुनरावृत्ती, चुकीच्या क्रियापदाचा वापर यासारख्या बाबी टाळून भाषेची शुद्धता कशी करावी याचे मार्गदर्शन प्रा. संभाजी पाटील यांनी केले. अध्यापनात आयसीटीचा वापर कसा करावा यावर डॉ. राजेंद्र सावंत यांनी विचार मांडला. आशिष आठवले यांनी संस्कृत भाषा हसतखेळत आणि सोप्या माध्यमातून मुलांच्या मनात कशी रुजवावी याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी भाषाशुद्धी आणि पाठ्यपुस्तकांचा सूक्ष्म विश्लेषण यावर अनुक्रमे डॉ. गोपीकृष्ण रघु आणि चिन्मय आमशेकर यांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात डॉ. कार्तिक राव यांनी दैनंदिन जीवनात संस्कृत भाषेचा वापर कसा करता येईल याचे विस्तृत विवेचन केले.
समारोप कार्यक्रमात शिक्षकांनी अनुभवकथन केले. तसेच सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी डॉ. कार्तिक राव, डॉ. राजेंद्र सावंत, डॉ. गोपीकृष्ण रघु, डॉ. संभाजी पाटील, डॉ. गौरव शर्मा, महाबल भट्ट, चिन्मय आमशेकर, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षक, उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कश्मिरा दळी यांनी केले. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी आभार मानले.













