Tanzania Alien-Like Creature : टांझानियाच्या जंगलात आढळले २०० पायांचे एलियनसदृश्य जीव; संशोधकही झाले चकित!

Alien-like Creature Found in Tanzania : दक्षिणपूर्व आफ्रिकेत असणाऱ्या टांझानिया देशातील जंगलात संशोधकांना काही अजब प्रकारचे किडे आणि प्राणी मिळाले आहेत. आतापर्यंत कधीही न पाहिलेले हे प्राणी एलियनसदृश्य असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

गोमसारख्या दिसणाऱ्या अनेक प्राण्यांचाही इथे शोध लागला आहे. या कीटकांना तब्बल 200 पायांचा असल्याचं संशोधकांनी सांगितलं. (Creatures with 200 Legs)

ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट विद्यापीठाने याबाबत माहिती दिली. टांझानियाच्या उडजुंगवा पर्वतावर झाडे आणि वेलींचा अभ्यास करताना या प्रजाती सापडल्या आहेत. या प्राण्यांचे तोंड सध्या माहिती असलेल्या गोम प्रजातीतील किड्यांपेक्षा वेगळं असल्याचं संशोधकांना जाणवलं.

विद्यापीठातील प्राध्यापक अँडी मार्शल यांनी सांगितलं, की ते जंगलांचा-झाडांचा अभ्यास करताना गोम आणि अशाच इतर कीटकांचा रेकॉर्ड ठेवतात. हे किडे जंगलाच्या विकासाचे संकेतक असतात. आम्हाला जेव्हा हे कीटक सापडले, तेव्हा ते अगदीच सामान्य वाटले. मात्र, तज्ज्ञांनी त्याचं निरीक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा किती मोठा शोध आहे.

या संशोधकांना पर्वतावर गोम कुळातील किड्यांचे पाच नवीन प्रकार आणि पाच नव्या प्रजाती मिळाल्या आहेत. या सर्वांना जवळपास 200 पाय आहेत. यातील सर्वात मोठी आफ्रिकी गोम ही 35 सेंटीमीटर लांब आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी गोम 15 सेंटीमीटर असते, यावरुन नव्या प्रजातीतील किड्याचा आकार किती मोठा आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

गोमच्या या नव्या प्रजातीला Udzungwastreptus असं नाव देण्यात आलं आहे. या सर्व किड्यांचे सॅम्पल हे डेन्मार्कच्या कोपेनहेगन विद्यापीठातील नॅच्युरल हिस्ट्री संग्रहालयात आणण्यात आलं आहे. या नवीन संशोधनामुळे हेच सिद्ध झालं आहे, की पृथ्वीवरील जंगलांमध्ये आपल्याला माहिती नसलेल्या कित्येक गोष्टी दडल्या आहेत, असं मार्शल म्हणले.