15 जानेवारी नंतर लागू न पडलेल्या थ्रिप्स वरील कीटकनाशकांचे पैसे माफ

आंबा बागायतदार कीटकनाशक उत्पादक कंपन्या प्रतिनिधी व विक्रेते यांच्या संयुक्त बैठकीत ठराव

आमदार नितेश राणे यांचा आंबा बागायतदारांना यशस्वी न्याय

थ्रिप्स बाबत जागतिक पातळीवर असलेले संशोधन बागायतदारांना उपलब्ध करून देऊ आमदार नितेश राणे यांनी दिला शब्द

थ्रिप्सच्या संकटामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून 15 जानेवारीनंतर थ्रिप्स वर फवारलेल्या कीटकनाशकांचा काहीही फायदा झाला नाही यामुळे कंपन्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना माफ करावे अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी कीटकनाशक उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, आंबा बागायतदार शेतकरी व कीटकनाशक विक्रेते दुकानदार यांच्या संयुक्त बैठकीत केली. तसा ठराव बैठकीत करण्यात आला कीटकनाशक कंपन्या व विक्रेते यांनी तो मान्य केला आहे.

देवगड येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहामध्ये आंबा बागायतदार संघटनांचे प्रतिनिधी, कीटकनाशक उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व कीटकनाशके विक्रेते यांची संयुक्त बैठक आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली

या बैठकीला माजी आमदार अजित गोगटे ,प्रकाश राणे , कीटकनाशक विक्रेत्यांचे अध्यक्ष हेमंत सावंत, पदाधिकारी पंकज दळी, देवगड तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे,अरीफ बगदादी सर्व आंबा बागायतदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडताना अनेक शेतकऱ्यांनी थ्रिप साठी असलेले कीटकनाशक लागूच पडत नसल्याचे सांगितले. कीटकनाशक लागू पडेल असे सांगून विक्रेते कीटकनाशक विकतात . मात्र त्याचा थ्रिप्स वर कोणताही फायदा झाला नाही यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आंब्याचे पीक गेलेच शिवाय मोठ्या प्रमाणात उधारीचा खर्चही झाला आहे. ही औषधे परिणामकारक नसून यासाठी कोकण कृषी विद्यापीठे अथवा कोणत्याही कृषी विभागाने त्यांना शिफारस दिलेली नाही म्हणजेच या औषधांना लेबल क्लेम नाही असे असताना ही औषधे या भागात विकून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असा मुद्दाही शेतकऱ्यांनी मांडला शेतकऱ्यांच्या वतीने एडवोकेट अजित गोगटे, प्रकाश राणे ,अयोध्या प्रसाद गावकर, भूषण बोडस यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली

गुणनियंत्रण अधिकारी शेणवे यांनी आपण वेळोवेळी औषधांचे नमुने घेतो जी औषधे नियमानुसार नसतील, ती औषधे विक्रीसाठी बॅन केली जातात. अशी माहिती सभेत दिली. नुकतीच दोन औषधे विकू नये म्हणून नोटीसा देण्यात आले असल्याची माहिती ही त्यांनी दिली

कीटकनाशक कंपनीच्या बाजूने सदा लांडगे
प्रो केअर कंपनी यांनी बाजू मांडली. जरी लेबल क्लेम नसला तरी आम्ही शेतकऱ्यांना विविध प्लॉटवर डेमो देतो. हे औषधे डेमो असतात लागू पडल्यास ते फवारू शकतात. जसे कृषी खाते अथवा विद्यापीठ संशोधन करते. त्याप्रमाणे आम्हीही संशोधन करतो. व शेतकऱ्यांना कीटकनाशके दिली जातात. जरी काही औषधे आंबा या विषयावर फवारावी अशी शिफारस नसली तरी ही औषधे विविध रोगांसाठी लागू पडतात. मात्र 15 जानेवारी नंतर असलेला थ्रिप्स हा मोठ्या रेजिस्टिव्हिटी असलेला असून यामुळे कीटकनाशके लागू पडत नाहीत हा वस्तुस्थिती धारक मुद्दा आहे. यापुढे थ्रिप्स वर कीटकनाशकेच लागू पडत नसल्याने त्याची विक्री ही बंद करत असल्याचे डीलर ने जाहीर केले

विक्रेत्यांच्या वतीने पंकज दळी, हेमंत सावंत व एकनाथ तेली यांनी बाजू मांडली. अन्य ठिकाणहून औषधे आणून शेतकरी फवारतात यांच्यावर कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे असा मुद्दा हेमंत सावंत यांनी मांडला. कीटकनाशकांची उधारी मोठ्या प्रमाणात असल्याने यापुढे उधारी देणे शक्य होईल की नाही असे प्रश्नचिन्ह एकनाथ तेली यांनी उभे केले.

आमदार नितेश राणे यांनी यावेळी बोलताना कीटकनाशके लागू पडत नसताना ती शेतकऱ्यांच्या माथी मारून नफा कमवणे हे चुकीचे असून या कीटकनाशकांचे पैसे माफ केले पाहिजेत अशा सूचना केल्या. कोणतेही कीटकनाशक कृषी विभागाच्या परवानगीशिवाय विकू नये तसेच विकत घेऊ नये अशीही सूचना आमदार नितेश राणे यांनी केली. शेतकऱ्यांना तुमच्या कीटकनाशकांचा काही फायदा होत नसेल तर त्याचे पैसे घेऊ नका, शेतकऱ्यांना हे पैसे माफ करावेत अशी मागणी कीटकनाशक कंपन्यांकडे केली. कृषी विभागाने याबाबत जागृत राहून संशोधन करणे गरजेचे आहे.कीटकनाशक विक्रीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. पिकांवरील कीड रोग हा सार्वत्रिक मुद्दा असून थ्रिप्स बाबत जागतिक पातळीवर असलेल्या समस्या व त्यावर होत असलेल्या उपाययोजना याबाबत आपण माहिती घेत असून लवकरच जागतिक पातळीवरचे संशोधन बागायतदारांना उपलब्ध होईल का? याबाबत चाचणी सुरू असून केंद्र सरकारची मदतही याबाबत आपण घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

कोणतेही कीटकनाशक शेतकऱ्यांना विकाल आणि मनमानी होईल. असे होऊ देऊ नका शेतकऱ्यांनीही पावती शिवाय कोणतेही कीटकनाशक घेऊ नये. तसेच कृषी अधिकारी व शेतकऱ्यांनी याबाबत जागृत राहावे अशी सूचना त्यांनी केली