सावंतवाडी । प्रतिनिधी : कुणकेरी येथील शासकीय वनातील भेडला माड जातीची २२७ झाडे तोडल्याप्रकरणी वन कोठडीत असलेले संशयित नईम हनीफ सलमानी, अनिलकुमार मिश्रीलाल भार्गव व रिजवान अनिस सलमानी (तिघेही मूळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा. इन्सुली ता.सावंतवाडी ) यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की १३ फेब्रुवारी रोजी वनक्षेत्रपाल सावंतवाडी हे आपल्या पथकासह वनपरिक्षेत्र सावंतवाडी ,परिमंडळ -कुणकेरी,नियतक्षेत्र कुणकेरिची जंगल तपासणी करीत असताना गाववस्तिच्या बाजूने राखीव वनक्षेत्रातील सर्व्हे नंबर ८१ मध्ये तपासणी दरम्यान भेडला माड प्रजातीच्या झाडांची तोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. शोध घेत असताना पुढे कोणीतरी झाडे तोडण्याचा आवाज आला त्यावेळी झाडे तोडीत असताना संशयित ह आढळून आले अशी हकीकत सांगून त्यांच्याविरुध्द भारतीय वन अधिनियम कायदा १९२७ चे कलम २६ (१) डी,ई ,एफ अन्वये फिर्याद दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली. ही मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपींतर्फे ॲड. वैभव चव्हाण व ॲड.सुप्रीम परब यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून आरोपींना अटी व शर्तींवरप्रत्येकी रक्कम रुपये २० हजार च्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. याबाबतची माहिती ॲड. सुप्रिम परब यांनी दिली आहे.











