आगामी सर्व निवडणुकीत विजयी गुलाल भाजपचाच ; निलेश राणे

Google search engine
Google search engine

धेय्य वेडे होऊन काम करा, जनतेची सेवा करा ; भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर युवक संवाद मेळावा

मालवण | प्रतिनिधी : भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपमध्ये कोणी मोठा नाही कोणी लहान नाही. संधी प्रत्येकाला मिळते मात्र प्रमाणिक कामातून प्रत्येकाने यश मिळवले पाहिजे. आगामी २०२४ मध्ये लोकसभा आणि राज्यतातील सर्व निवडणुकीत भाजप जिंकेलच. मात्र तुम्हा युवकांचे त्या विजयात योगदान किती हे महत्वाचे आहे. त्यासाठी धेय्य वेडे होऊन काम करा. जनतेची सेवा करा. असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केले.

दरम्यान, आगामी मालवण नगरपालिका निवडणुकीत गुलाल फटाके भाजपचेच असणार. सर्व निवडणुकीत १०० टक्के यश भाजपला मिळणार. वैभव नाईकला जनता घरी बसवणार. असे सांगून निलेश राणे यांनी मालवणात दरवर्षी भव्यदिव्य पर्यटन सांस्कृतिक महोत्सव भरवणार असे स्पष्ट केले..

भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर युवक संवाद मेळावा मालवण शहर येथील दैवज्ञ भवन सभागृहात भव्यदिव्य पद्धतीने मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, युवमोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, उद्योजक दीपक परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, अभय कदम, भाई मांजरेकर, युवमोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, निकीत वराडकर, सरचिटणीस निषय पालेकर, राकेश सावंत, फ्रँसिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निलेश राणे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळ्या उंचीवर नेले. आज ना. राणे केंद्रीय राजकारणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर व खंबीर नेतृत्वाखाली देशपातळीवर काम करत आहेत. मात्र त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या मतदारसंघात काम।केले त्याला तोड नाही. यापुढेही मालवण कुडाळसह जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधींचा विकासनिधी आणायचा आहे. असेही निलेश राणे म्हणाले.

निलेश राणे म्हणाले, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ही पक्षाची संपत्ती आहे. दत्ता सामंत, अशोक सावंत यांच्यासारखे निष्ठवंत आहेत. दत्ता सामंत यांना अनेक पक्षातून ऑफर आल्या मात्र त्यांनी सांगितले हा जन्म राणे साहेबांचा आहे. अशोक सावंत सांगतात ३३ वर्ष राणे साहेबांसोबत यापुढेही राणे साहेबांसोबत असे सच्चे सहकारी ही पक्षाची संपत्ती आहेत. असे सांगत सर्वांचे कौतुक केले. सत्तेची नशा ठाकरेंच्या डोक्यात गेली आणि सत्ता गेली. अहंकार असता नये. बाळासाहेब ठाकरे यांची विशेष आठवण निलेश राणे यांनी काढली. आज अनेक पक्षात बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली नेतेमंडळी आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचे कर्तृत्व आहे. असे निलेश राणे म्हणाले.

कार्यक्रमात भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी प्रास्ताविक करत प्रथम देश नंतर पक्ष नंतर मी या भाजप पक्षाच्या धेय्य धोरणानुसार काम करून युवकांनी संघटना अधिक मजबूत करत काम करूया. असे आवाहन त्यांनी शहरातील युवकांना केले. यावेळी उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनीही विचार मांडले. तसेच जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनीही आपल्या आक्रमक व प्रभावी शैलीत विचार मांडले. या मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यावेळी शहरातील युवक पदाधिकारी यांना नियुक्ती देण्यात आल्या. निलेश राणे, दत्ता सामंत यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबाबत ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर व सहकारी यांचे विशेष कौतुक केले.

निलेश राणे यांना बहुमताने आमदार करण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करूया : दत्ता सामंत

महाराष्ट्र प्रदेश सदस्य दत्ता सामंत म्हणाले, युवकांनी निलेश राणे यांना आदर्श ठेऊन काम करावे. तरुण वयात देशाचे सर्वोच्च सभागृह संसदेत खासदार म्ह्णून त्यांनी काम केले. जनतेला न्याय देण्याचे काम निलेश राणे करत असतात यांची तळमळ कौतुकास्पद व आदर्शवत आहे. आगामी काळात मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांना बहुमताने आमदार करण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करूया. निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीर रहा. आगामी निवडणुकीत भाजपच्या १०० टक्के यशासाठी सर्वांनी काम करा. सातत्य राखा. असे आवाहन भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी केले.