अनारक्षित मेमू स्पेशलची वाढीव फेरी १९ रोजीही धावणार

खेड(प्रतिनिधी)कोकण व मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण मार्गावर ३१ मार्चपर्यंत ८ डब्यांची चिपळूण-पनवेल, पनवेल- रत्नागिरी अनारक्षित साप्ताहिक मेमू स्पेशल फक्त रविवारी धावत असून प्रवाशांचाही उदंड प्रतिसाद लाभत आहे. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी कमी करण्यासाठी दोन्ही अनारक्षित मेमू स्पेशलच्या १९ फेब्रुवारी रोजीही वाढीव फेऱ्या धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सलग सुट्ट्यांसह सोमवारी शिवजयंती उत्सव असल्याने शिवप्रेमी व चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणार आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांना गर्दी उसळण्याची शक्यता आहे. ३१ मार्चपर्यंत धावणाऱ्या दोन अनारक्षित मेमू स्पेशलच्या वाढीव फेऱ्या १९ फेब्रुवारीलाही चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याचे  जाहीर केले आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.