सुकिवली कुणबी शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार

खेड(प्रतिनिधी) जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रत्नागिरीच्या वतीने दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार खेड तालुक्यातील सुकिवली कुणबी शाळेला जाहीर झाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातून शाळांची निवड केली जाते. सन २०२३/२४ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक गटातून खेड तालुक्यातील सुकिवली कुणबी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला असून तशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्तीकिरण पुजार यांनी केली आहे. शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम, शाळेची शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती निकाल, शैक्षणिक उठाव, समाज संपर्क, शालेय दैनंदिन उपस्थिती या विविध मुद्द्यांची तपासणी शिक्षण विभागाच्या पथकामार्फत केली जाते. चालू शैक्षणिक वर्षात वरील सर्व उपक्रमात सुकिवली कुणबी शाळेने उल्लेखनीय कामगिरी केल्याने शाळेची शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक गटातून आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खेड तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, विस्तार अधिकारी श्री. विजय बाईत, केंद्रप्रमुख श्री. चौरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ खोपटकर, सौ. संचिता धाडवे, व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, सर्व पालक, ग्रामस्थ, केंद्रातील सर्व शिक्षक यांनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमाताई आंधळे, उप शिक्षिका सौ. कल्याणी शिंदे झावरे यांचे अभिनंदन केले.