” हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’च्या वेळांमध्ये बदल

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिळणार उपचार

आतापर्यंत १२१४ रुग्णांनी घेतले उपचार ; वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

कणकवली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना’ ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे. तशीच ती उत्तमरित्या यशस्वी देखील झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात “आपला दवाखाना’ चे रुग्णालय सुरू करण्यात आले. कणकवली तालुक्यात देखील पंचायत समिती नजिक “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय पाहता जिल्ह्यातील नागरिकांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “आपला दवाखान्यांच्या’ वेळांमध्ये बदल करावा अशी मागणी केली जात होती.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित बैठकीवेळी नागरिकांच्या मागणीची दखल घेतली. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या आपला दवाखान्यांच्या वेळामध्ये बदल करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

 

कणकवलीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी वेळ बदलण्याबाबत अद्याप पत्र प्राप्त झाले नाही. मात्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून वेळ बदलण्याचे आदेश आले आहेत. त्यानुसार हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.

 

आपला दवाखाना कणकवली येथे रुग्णसेवेसाठी १० ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाला. मात्र काही कमी प्रमाणात नागरिकांना या ठिकाणी मिळणाऱ्या सेवा सुविधा समजल्या नाहीत. मात्र आपला दवाखाना येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपला दवाखाना सकाळी ९ ते सायं. ५ यावेळेत सेवा देणार आहे. तसेच “आपला दवाखाना’ सुरू झाल्यापासून १२१४ लोकांनी या ठिकाणी उपचार घेतले आहेत. ज्या प्रमाणे खाजगी रुग्णालयात पैसे देऊन रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. मात्र आपला दवाखाना येथे सर्व तपासण्या विनाशुल्क केल्या जात आहेत. तसेच त्यावर योग्य निदान देखील केले जाते. विशेष करून डायबिटीस, ब्लड प्रेशर, संधिवात या आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात अशी, माहिती डॉ. श्री. गोसावी यांनी दिली.