सायंकाळनंतर रात्रभर सुरू होणाऱ्या क्रशरमुळे दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम

लांजा तालुका काँग्रेसचे प्रभारी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांची तहसीलदारांकडे तक्रार

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील पालू येथे दिवसरात्र सुरू असणाऱ्या क्रशरचा त्रास हा या परिसरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना होत आहे. विशेष बाब म्हणजे २१ फेब्रुवारी पासून १२ परिक्षेला सुरूवात होणार आहे..मात्र याकडे तहसील प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे तहसील प्रशासन या क्रशर चालकाला पाठीशी घालत आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रभारी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांनी उपस्थित केला आहे.

पालू आणि कोलेवाडी गावच्या सीमेवर काळ्या दगडाचे उत्खनन करणारा खडी क्रशर सुरू आहे. विशेष बाब म्हणजे पालू हे गाव इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे आणि या खडी क्रशरला दोन्ही गावातील ग्रामस्थांचा कडाडून विरोध असताना देखील जिल्ह्यावरून या खडी क्रशरला परवानगी देण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अशा प्रकारची परवानगी देण्यात आली कशी? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

या खडी क्रशरचे काम दिवसा बरोबरच रात्री देखील सुरू असते. त्यामुळे दिवसा बरोबरच रात्री देखील घरात झोपणे हे ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. दि.२१ फेब्रुवारीपासून बारावीची आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षे ला सुरुवात होणार आहे. मात्र दिवस-रात्र सुरू असणाऱ्या क्रशरच्या आवाजामुळे येथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. वास्तविक क्रशर रात्री बंद करणे आवश्यक असताना तो सायंकाळी सुरू होऊन रात्रभर चालू असतो. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सायंकाळी, रात्री बरोबरच पहाटे देखील या आवाजामुळे अभ्यास करणे कठीण झाले आहे. क्रशरच्या आवाजामुळे लक्ष विचलित होऊन अभ्यास करण्यावर रिणाम होत आहे.

पालू गाव हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे आणि अशा प्रकारे खडी क्रशर चालू होत असेल तर येथील इको सेन्सिटिव्ह झोन उठवण्यात यावा, असे हेगिष्ट्ये यांनी म्हटले आहे.तरी लांजा तहसीलदार यांनी यात जाणीवपूर्वक लक्ष घालावे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांनी केली आहे.