खेड(प्रतिनिधी) खेड शहरात शिवसेना व युवासेनेने आयोजित केलेल्या योगेश दादा युवा महोत्सवामध्ये खेड तालुक्यातील आजी माजी सैनिक, विरमाता व विरपत्नी यांचा सन्मान दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, सौ. ज्योती रामदास कदम आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जामगे येथील छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी संचालन करून राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीत सादर केले. नृत्याचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाला. यामध्ये अनेक शाळांमधील विद्याथ्र्यांनी आपले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आमदार योगेश कदम यावेळी म्हणाले की, देशाचे रक्षण करताना स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांचे जितके महत्व आहे तितकेच महत्व त्यांच्या कुटुंबियांचे देखील आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माजी सैनिकाच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम मी लवकरच राबवणार असल्याचे स्पष्ट केले. तुम्हा सर्वांसोबत आमची तुलना कधीच होऊ शक्त नाही. कारण तुम्ही आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाची सेवा करता. आपले हे योगदान अमूल्य आहे, असेही ते म्हणाले.
यानंतर माजी मंत्री रामदास कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोकणातील जवानांचे विशेष कौतुक केले.
आजही मराठा बटालियन मध्ये कोकणातील लोकांची संख्या ही सर्वाधिक असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सर्जिकल स्ट्राईक केले ते अप्रतिम होते. आपल्या जवानांनी पाकिस्तानात जाऊन त्यांचा खात्मा केला आणि आपल्या देशात परतले ही साधी बाब नाही.
देशाच्या सीमेवर रक्षण करणारे जवान आहेत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे माजी सैनिकांसाठी व वीरपत्नी यांच्यासाठी विशेष योजना राबवावी म्हणून पुढाकार घ्यावा, अशी विनंती करणार असल्याचे सांगितले.
आपल्या भागातील माजी सैनिकांना कोणतीही अडचण उद्भवली तरी फक्त मला एक फोन करा तुमच्यासाठी सगळी कामे बाजूला ठेवून मी तुमच्या समस्या मार्गी लावेन असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, पंचायत समितीचे माजी सभापती जीवन आंब्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, चंद्रकांत चाळके, शहरप्रमुख कुंदन सातपुते, माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे, स्वप्नील सैतवडेकर, माजी सभापती सौ. सुप्रिया पवार, सौ. माधवी बुटाला, सिद्धेश खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










