वनपाल सुरेश उपरे यांची संकल्पना, जखमी अवस्थेतील बिबट्यास हाताळणे होणार सुलभ
खेड(प्रतिनिधी) बिबट्यांच्या वाढत्या प्रमाणांसह खाद्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. भक्ष्याच्या मागून बिबट्या राहत्या घरात घुसण्याच्या घटनाही घडत आहेत. यापार्श्वभूमीवर घरात घुसलेल्या बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी येथील वनपाल सुरेश उपरे यांच्या संकल्पनेतून एका पिंजऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे फासकीतील जखमी अवस्थेतील बिबट्यास हाताळणे सोयीचे होणार आहे.
घरात बिबट्या घुसल्यानंतर त्याचा मागोवा घेणे शक्य होत नाही. बिबट्या घरात आहे की बाहेर निघून गेला याचा सुगावाच लागत नाही. अशा वेळी जबाबदारी घेत घरामध्ये घुसून त्याचा मागोवा घ्यावा लागतो. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वनपाल सुरेश उपरे यांनी एका पिंजऱ्याची निर्मिती केली आहे. हा पिंजरा साधारण २० किलो वजनाचा असून पिंजऱ्यात बसून तो पायाने चालत नेता येतो.
यासाठी पिंजऱ्याच्या तळाला पायांसाठी दोन
झडपा तयार केल्या आहेत. पिंजऱ्याला लोखंडी जाळी लावण्यात आली असून अर्ध्या पिंजऱ्याला
आतून डबल जाळीचे आवरण आहे. पिंजऱ्याची रचना घराच्या दरवाजाच्या मोजमापाप्रमाणे लांबी २-६ फूट रूंदी २-० फूट उंची ४-० फूट अशी आहे. पिंजऱ्यात बसलेल्या व्यक्तीला आधारासाठी दोन्ही बाजूस हॅण्डल आहेत. घरातील दरवाजे बंद करणे, कडी-कोयंडा काढण्यासह लावण्यासाठी पिंजऱ्यातील व्यक्तीचा हात सुरक्षित बाहेर घेता येईल यासाठी झडपाही तयार केल्या आहेत.
बिबट्या घराच्या माळ्यावर लपून बसला असल्यास त्याचा मागोवा घेण्याकरिता पिंजऱ्याच्या वरील बाजूस झडप ठेवलेली आहे. या झडपेतून फोल्डींग स्टीकला कॅमेरा लाईट लावून पिंजऱ्यातील व्यक्ती अगर बाहेरची व्यक्ती बिबट्याचा मागोवा घेवू शकते. बिबट्याच्या झडपेने पिंजरा उघडल्यास अथवा पिंजऱ्याचा तोल गेला तर पिंजऱ्यातील व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी पाय ठेवण्याच्या ठिकाणी झडपांचा समावेश आहे. या पिंजऱ्यामुळे फासकीतील जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्यास हाताळण्यासह उपचार करणे सोयीचे होणार आहे. यामुळे हा पिंजरा रेस्क्यू पथकासाठी वरदान ठरेल. असा विश्वास वनपाल सुरेश उपरे यांनी व्यक्त केला.










