संकल्प इंटरप्राइजेसकडून लोकांच्या झालेल्या फसवणुकीस पोलीस प्रशासन जबाबदार

 

राष्ट्रवादीचा आरोप : प्रसंगी न्यायालयात दाद मागणार 

पोलिसांकडे सर्व प्रकारचे पुरावे देऊनही दखल न घेतल्याचा दावा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात कार्यालय सुरू करून लाखोंचे कर्ज देण्याचे आम्हीच दाखवून गोरगरीब जनतेला गंडा घालत पोबारा केलेल्या संकल्प इंटरप्राईजेस या कंपनी बाबत पोलिस प्रशासनाला आगाऊ कल्पना देत त्या प्रकारचे पुरावे देखील सादर करण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून उलट त्यांनाच संरक्षण दिल्याने लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे याला पोलीस प्रशासनच जबाबदार असून या विरोधात सीआयडी चौकशीची मागणी करणार आहोत तसेच वेळ पडल्यास न्यायालयातही दाद मागू, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रवीण भाई भोसले व कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानेच लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, ॲड.सायली दुभाषी, सावली पाटकर, पूजा दळवी आदी उपस्थित होते.

सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरात संकल्प इंटरप्राईजेस या नावाने कार्यालय सुरू करून गोरगरिबांना व्यवसायासाठी अत्यल्प व्याज दराने लाखो रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी देत करोडो रुपयांची माया गोळा करत या कंपनीने आपला गाशा गुंडाळला. याबाबत आपल्याला सुरुवातीलाच शंका आल्याने तसेच सदर कंपनीचे अधिकारी हे राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या नावाचा वापर करीत असल्याने याबाबत त्यांना बोलवून आपण त्यांच्याकडे सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, त्यांच्याकडून आवश्यक असलेली माहिती न मिळाल्याने याबाबत शंका निर्माण झाली. त्यानंतर १७ जानेवारी रोजी आपण त्याबाबतचे सर्व पुरावे हस्तगत करून सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस प्रशासनाचे त्याकडे लक्ष वेधले होते. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाला टाळे लावत पलायन केले. पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर जनतेची लाखो रुपयांची फसवणूक टाळता आली असती असा आरोप यावेळी अर्चना घारे परब यांनी केला.

विशेष म्हणजे संकल्प इंटरप्राईजेस या कंपनीने छत्रपती फायनान्स या नावाने सदरचा व्यवहार सुरू केला होता. मुळात छत्रपतींच्या नावाचा असा गैरवापर करणे हा देखील गुन्हा होऊ शकतो. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांची ही त्यांनी फसवणूक केली असून कार्यालयात कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांचेही पगार थकीत आहेत. लोकांच्या पैशांच्या परताव्यासाठी त्यांनी २९ फेब्रुवारी ही तारीख दिली असून तो पर्यंत पैसे परत देऊन जनतेला न्याय न दिल्यास त्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी २९ तारखेनंतर आपल्या कार्यालयात सबळ पुराव्यानिशी रीतसर तक्रार अर्ज आणून द्यावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.