लांजा भटवाडी शाळे नजीकच्या मोरीत टाकला जातोय घाण आणि कचरा

त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण

लांजा (प्रतिनिधी) लांजा साटवली मार्गावर भटवाडी शाळेनजीतक असलेल्या मोरीत सध्या काही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले असून यावर नगरपंचायतीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

लांजा साटवली हा कायम वर्दळीचा रस्ता आहे .या रस्त्याने पादचार्यां बरोबरच पहाटे तसेच सायंकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भटवाडी शाळेजवळ असलेल्या मोरीत काही नागरीकांकडून कचरा टाकला जात आहे काही चिकन विक्रेत्यांकडून देखील चिकनची घाण कचरा या ठिकाणी टाकला जात आहे .त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी येता जाताना नागरिकांना नाकावर रुमाल घेऊन ये जा करावी लागते. इतकी दुर्गंधी या ठिकाणी पसरली आहे.
या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी नगरपंचायतीमार्फत कचरा टाकणार्याला ५०० रुपये दंड केला जाईल असा सूचनावजा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून लोकांकडून या ठिकाणी कचरा, घाण टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लांजा नगर पंचायतीने याबाबत चिकन विक्रेते यांना सूचना द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.