विविध वैज्ञानिक प्रकल्पावर पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले सादरीकरण
कणकवली: 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर आधारित शाळेत विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीपासून ते नववी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण करत आपला सहभाग दर्शवला. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून आनंदीबाई रावराणे कॉलेज वैभववाडी येथे बॉटनी डिपार्टमेंट ला असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असणारे श्री. विजय पैठणे यांची उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांनी जैवविविधता, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हरित ऊर्जा , विद्युत प्रदूषण व अशा विविध प्रयोग व प्रात्यक्षिकांवर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण केले. अनेक वैज्ञानिक नियमांचा वापर करून तयार केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत परीक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती कणसे व परीक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्याचबरोबर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आर्ट इन-फोकस’ या रंगकला व हस्तकला (Art & Craft)चे प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या चित्रकला या विषयातील मुख्य सात घटकांवर आधारित तयार केलेल्या वस्तू व चित्रे ही मुख्य संकल्पना होती. प्रस्तुत प्रदर्शनासाठी कणकवली येथे इव्हेंट डेकोरेटर म्हणून कार्यरत असणारे श्री. प्रवीण चिंदरकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. या प्रदर्शनात उपस्थित सर्व पालक, प्रेक्षक या सर्वांसाठी सेल्फी पॉइंट, ड्रॉइंग पॉइंट व अशाच विविध आकर्षक गोष्टींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व पालक , प्रेक्षक यांच्यातर्फे प्राचार्या सौ. स्वाती कणसे यांच्या मार्गदर्शनीय व्यवस्थापनाखाली आयोजित करण्यात आलेल्या अतिशय उत्तम अशा कार्यक्रमासाठी कौतुकांचा वर्षाव केला गेला.












