शिवाजी जगताप खेडचे नवे उपविभागीय अधिकारी

खेड(प्रतिनिधी) देशामध्ये होऊ घातलेल्या १८व्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशासनाच्या खातेअंतर्गत बदल्या सुरु असुन सातारा येथील सक्षम प्राधिकारी तथा भुसंपादन अधिकारी क्र.२ म्हणून कार्यरत असलेले शिवाजी जगताप यांची खेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील पणदरे हा त्यांचा मुळ गाव आहे. शिवाजी जगताप यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असुन पुणे-मिरज व फलटण- बारामती रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण या प्रकल्पाच्या जमीन भुसंपादन कामात त्यांनी कमी कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन भूसंपादित केली होती. जगताप हे आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया या विषयाचे पदवीधर असून सन २०१४ साली त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली व अमरावती जिल्ह्यातील भातकुली उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणून प्रथमता त्यांची नियुक्ती करण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणून जगताप हे कार्यरत असताना आपल्या कामाविषयी नितांत सचोटी राखता कर्तव्यपरायणता ठेवता महसूल विभागाचा लौकिक व शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल त्यांचा सर्वोकृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सातारा यांनी पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

चौकट-

लोकाभिमुख प्रशासन राबवत असतेवेळी नागरिकांची कामे विहित नमूद कालावधीत केली जातील. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल- शिवाजी जगताप (नवनियुक्त उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग)