आंबोली । प्रतिनिधी :
आंबोली वनपरिक्षेत्रातील मौजे आंबोली हिरण्यकेशी अनिर्णित वनसर्वे क्र.२३ या वनविभागाच्या ताब्यात असलेल्याशासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून सदर क्षेत्रात १४ बंगले, ४ चौथरे व एक विहीर असे अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते.
सदर प्रकरणी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ कलम ५३, ५४ व ५४ (अ) अन्वये योग्य तो तपास पूर्ण करून मंगळवारी महसूल विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त कारवाईने आंबोली हिरण्यकेशी अनिर्णित वनसर्वे क्र.२३ मधील क्षेत्रात अतिक्रमण करून बांधकाम केलेले सर्व चिरेबंदी बांधीव व सदर क्षेत्रातील इतर साहीत्य जेसीबीच्या साहाय्याने काढून अतिक्रमण काढून टाकण्यात आले.
यावेळी अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी झालेला सर्व खर्च संबधित अतिक्रमण करणारे यांचे नावावर महसूली अभिलेखी बोजा चढविणेत येणार असल्याचे संबधित विभागाने सांगितले. सदर प्रकरणी पोलिस विभाग सावंतवाडी यांनी उपस्थित राहून अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी सहकार्य केले. याबाबतची माहिती सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली आहे.












