मंदिरांचे जतन, संवर्धन आणविश्वस्तांचे संघटनासाठी रत्नागिरीत १० मार्चला महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

रत्नागिरी – मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरातील पैसा हा मंदिराचे व्यवस्थापन, मंदिर संस्कृतीचे जतन आणि सवंर्धन, पुरातन मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि मंदिरातील धर्मकार्य यांव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. हे थांबले पाहिजे तसेच मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी यांचे संघटन, त्यांच्या समस्या सोडविणे, सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या नियंत्रणात देणे, अशा विविध विषयांच्या अनुषंगाने महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १० मार्च २०२४ या दिवशी ‘श्रद्धा साफल्य मंगल कार्यालय, एमआयडीसी, रत्नागिरी’ येथे एक दिवशीय महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक आणि हिंदू जनजागृती समिती चे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘या परिषदेला रत्नागिरी जिल्ह्यातील ४०० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत. यात मुख्यत्वेकरून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू सत्यवान कदम, माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, पुणे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनिल घनवट, श्री मंगळग्रह संस्थान, अंमळनेरचे अध्यक्ष श्री. डिगंबर महाले, श्री. अनुपजी जैस्वाल, देवस्थान सेवा समिती विदर्भ सचिव (अमरावती), हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

या पत्रकार परिषदेला श्री मंगळग्रह संस्थान, अंमळनेरचे अध्यक्ष श्री. डिगंबर महाले, श्री अंबामाता मंदिर खेडशीचे विश्वस्त आणि श्री मरुधर विष्णू समाज सेवा समितीचे समन्वयक श्री. दीपक देवल, श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थान, राजीवडाचे सचिव श्री. देवेंद्र झापडेकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे उत्तर रत्नागिरी समन्वयक श्री. सुनील सहस्त्रबुद्धे आणि हिंदू जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी उपस्थित होते.

या मंदिर अधिवेशनामध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. तसेच दुसरी राज्य स्तरीय परिषद ओझर अष्टविनायक येथे घेण्यात आली. त्यानंतर गोवा, कर्नाटक राज्यांमध्ये मंदिर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ ११ महिन्यांमध्ये ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात केवळ ६ महिन्यांत ४१५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.

या वेळी श्री. डिगंबर महाले म्हणाले की, अंमळनेरचे मंगळ ग्रह मंदिर हे विश्वातील एकमेव मंगळग्रह मंदिर आहे. देवस्थान म्हटलं की पूजाअर्चा हे धार्मिकता जोपासणारे कार्यक्रम होतातच; परंतु त्याचबरोबर सामाजिक जाणीवेचे भान ठेऊन जे सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्यामुळे आतापर्यंत या मंदिराला4 ISO मानांकन प्राप्त झालेलेआहेत. भारत सरकारने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर केवळ दोन मंदिरांसाठी स्पेशल कव्हर कार्य केले. त्यापैकी हे एक मंदिर व दुसरे काळाराम मंदिर आहे.

हे मंदिर न्यास अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी असून अन्य कोणाला सहभागी व्हायचे असल्यास 9422050560, 8983265759 या क्रमांकांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू जनजागृती समिती यांच्याकडून करण्यात आले आहे.