देवगड : प्रतिनिधी
ओम नम: शिवाय च्या नामघोषात कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सवामध्ये कुणकेश्वर तीर्थस्थानी पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला.रविवारी पवित्र तिर्थस्नानाने यात्रेची सांगता होणारा आहे.

कुणकेश्वरची विधीवत पुजा झाल्यानंतर दर्शनाला सुरूवात झाली.सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती. केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे, सौ.निलमताई राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर, आमदार नितेश राणे, उद्योजक किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, परशुराम उपरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, अमोल लोके,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर गटविकास अधिकारी वृक्षाली यादव आदींनी दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्यावतीने लोकप्रतिनिधी,महनीय व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला.

ना.नारायण राणे व सौ.निमताई राणे यांचा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, एकनाथ तेली आदी पदाधिकारी व ग्रामस्थ यांचावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी ना.राणे यांनी कुणकेश्वर या धामिर्क पर्यटन स्थळाचा विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.ना.राणे यांनी कुणकेश्वर देवस्थानला १ लाख रूपये देणणी यावेळी दिली.
कुणकेश्वर यात्रोत्सवामधील बचतगटांच्या माध्यमातून उभारलेल्या स्टॉलचे उद्घाटनही ना.राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कुणकेश्वर यात्रा तीन दिवस असून या यात्रेला सकाळपासूनच भाविकांचा जनसागर लोटला होता.यात्रेमध्ये रस्त्याच्या दुतफार् विविध प्रकारची मिठाई,हॉटेल्स,मालवणी खाजा,कापड दुकाने,चायना खेळणी यांनी यात्रा परिसर फुलुन गेला होता.या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेतीअवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली होती. कुणकेश्वरच्या समुद्रकिनारीही भेळ,आईस्क्रिम,इतर हॉटेल्स यामुळे समुद्रकिनारा दुकानाने भरून गेलेला दिसून येत होता.चायना वस्तू ते हस्तकला, धामिर्क व सामाजिक संस्थांची माहिती देणारी केंद्रे यातून यात्रा सजली होती.

गृहपयोगी वस्तु, कलिंगड बाजार यांनी संपुर्ण कुणकेश्वर सजले होते.मंदीर परिसर व यात्रेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व सेवा मंडळ यांनी खास रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. सागरी सुरक्षेच्या दृष्टिने लाइफ जॅकेट धारक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,कर्मचारी सतर्कतेने काम करत होते.तसेच ग्रामस्थांचे भरारी पथक देखील समुद्रस्नान करणाऱ्या भाविकांवर लक्ष देऊन आहेत.सायंकाळपासून समुद्रकिनाऱ्यावर भाविकांच्या गर्दीचा उच्चांक दिसून येत होता.












