भाजपाच्या माध्यमातून रेडी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल : माजी खासदार निलेश राणे

रेडी गावातील श्री देवी माऊली मंदिराच्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ!

वेंगुर्ले : दाजी नाईक

रेडी येथील प्रसिद्ध श्री माऊली मंदिराच्या विविध विकास कामांचा शुभारंभ होत असताना या धार्मिक स्थळाला अजूनही मोठे नावलौकिक प्राप्त होणार आहे. भाजपच्या माध्यमातून रेडी गाव विकासाच्या पटलावर घेण्यासाठी येथील माजी सभापती प्रितेश राऊळ आणि सरपंच रामसिंग राणे हे दोघे अतिशय मेहनत घेत आहेत. रेडीवासियांनी प्रत्येक वेळी साथ देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. कारण विकास कामे मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करणे सोपे नसते. त्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो. या दोघांच्या कामाबद्दल खरोखरच कौतुक आहे असे सांगून रेडी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि करणार आहोत असे प्रतिपादन माजी खासदार तथा कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी रेडी येथे बोलताना केले.

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात श्री देवी माऊली मंदिर येथे नव्याने मंजूर झालेल्या अन्नछत्र सभागृह, भक्तनिवास इमारत व मंदीर परिसर सुशोभिकरण या कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात माजी खासदार तथा कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी जि.प. सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, भूषण सारंग, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे,देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रा.प.सदस्य, आदी मान्यवर व रेडी ग्रामस्थ उपस्थित होते.

साहेब यांच्या प्रमुख उपस्थित संबंधित कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांनी ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती लावली.

देवस्थानच्या वतीने प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रेडी गावावर विशेष प्रेम आहे. आजपर्यंत त्यांच्या माध्यमातूनही अनेक कामे मार्गी लागली आहेत. आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या नूतन कामाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. रेडी वासियांनी भाजपाच्या माध्यमातून होत असलेल्या या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना साथ द्यावी असे आवाहन निलेश राणे यांनी केले.

यावेळी बोलताना माजी आमदार राजन तेली म्हणाले की, रेडी येथील माऊली देवस्थानच्या भक्तनिवास व सुशोभीकरण कामानंतर हे स्थळ एक मोठं धार्मिक स्थळ म्हणून अजून प्रसिद्ध होणार आहे. हा विकासाचा रथ भाजपाच्या माध्यमातून असाच पुढे पुढे जाण्यासाठी सर्वांनी सोबत रहा असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रितेश राऊळ यांनी केले.