सिंधूरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट : दीपक केसरकर

सावंतवाडीत काजू बोंड प्रक्रिया मार्गदर्शन व यंत्रसामुग्री अनुदान मंजुरी मेळावा

विविध योजनांच्या लाभार्थींना मंजुरी पत्रांचे वितरण

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा ही सोन्याची खाण आहे. या जिल्ह्याला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलं आहे. याच नैसर्गिक वरदानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन प्रकाश आणायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुम्ही त्यासाठी संकल्प केला व तुमची सगळ्यांची साथ लाभली तर सिंधुरत्न समृद्ध योजना निश्चितच यशस्वी होईल व सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असा विश्वास सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लाभ आजपासून तुम्हाला मिळणार आहे. प्रशिक्षण व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांची सबसिडी देखील त्वरीत मिळणार आहे‌. जवळपास ५ हजार ८५० लाभार्थ्यांना या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे‌. प्रशिक्षण घेतलेल्यांना साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आल्याने आता प्रत्यक्ष उत्पादन सुरु होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात सिंधूरत्न समृद्ध योजना काजू बोंड प्रक्रिया मार्गदर्शन व यंत्रसामुग्री अनुदान मंजुरी मेळाव्यात उपस्थित लाभार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महामंडळाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बुधवळे, जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, उद्योजक अमित कामत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, डॉ. आनंद तेंडूलकर, सुरज परब, डॉ. गव्हाणकर, ललित खापरे, निर्माता विवेक चंद्रजी, योगेश कोंडे आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, काजू बोंड प्रकियेसाठी आलेले ५०० अर्ज मंजूर करण्यात येत आहेत. त्यासाठी जे लागेल ते सहकार्य केलं जाईल, काजूचा हंगाम चुकता कामा नये यासाठी सर्व लाभार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. काजू बोंडापासून काजू बोंड सिरप व काजू रस तयार केले जाते. तर भविष्यात उरलेल्या चौथ्या पासून कबाब तयार करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्राझीलकडून विशिष्ट मशिनरी आयात करण्यात येणार असून त्याचे प्रशिक्षणही लवकरच देण्यात येईल. काजूचे उत्पादन वाढविण्यासाठी काजूंना पाणी देण्यासाठी सहकार्य केले जाईल. तसेच ओला काजूला अधिक दर असल्याने त्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक संशोधनासाठी ही पैसे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तर आईन वृक्षापासून टसर रेशीम निर्मिती प्रकल्पासाठी ६० लाख रूपये प्रशासनाकडे दिले आहेत. राज्यात भंडारा येथे टसर सिल्क व्यवसाय यशस्वी झाला आहे. साधारणतः विदर्भासारखेच जंगल आपल्याकडेही आहे. मात्र, तेथील उन्हाळा जास्त कडक असल्यामुळे रेशीम उत्पादन करणारे किडे मरून जातात मात्र आपल्याकडे त्यामानाने उन्हाळा कमी आहे. त्या भागात ६० टसर सिल्क धागा तयार होतो तर आपल्याकडे ४० दिवसात तो तयार होणार आहे.

त्यासाठी ज्यांच्या जमिनीत आईन वृक्ष आहेत त्यांनी या प्रकल्पासाठी त्वरित नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपल्याकडे भात शेती केल्यानंतर जमीन कोरडी राहते. त्यामुळे आपली शेतजमीन वापरात यावी यासाठी दुबार पिकासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. सिंधुदुर्गतील कोणतीही शेतजमीन रिकामी राहणार नाही याची काळजी घ्या, दुबार पीक घ्यायचे असल्यास कृषी खात्याच सहकार्य आपल्याला राहील. दोडामार्ग मध्ये पाटाच पाणी जाणाऱ्या भागात हळदीच पीक घेतलं जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सर्व प्रकल्प यशस्वी होण्यासाठी जलदगतीने काम करताना समर्पणातून काम करणं आवश्यक आहे. पर्यटनाच्या सगळ्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. ज्यावेळी प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळी त्वरीत सबसिडी देखील दिली जाईल. सगळ्या योजनांचे पैसे संबंधित विभागाकडे दिले आहे. कमीत कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प इथे उभारण्यात यावेत. १७७ जणांना दुधाळ जनावरे देण्यात येणार आहे‌त. देशी गाई दिल्या जाणार आहे. दुध विकत घेण्याचा करार केला जाणार आहे. कुक्कुट ग्राम अंतर्गत कोंबड्या देण्यात आल्या असून ‘हॅपी एग्ज’ खरेदी करण्याची सोय देखील करण्यात आली आहे. दहा रूपयांचा दर प्रति अंड्याला देण्यात आला आहे‌. उत्पादन वाढीसाठी पपई व शेवग्याची झाडे देखील १०० टक्के अनुदानावर देण्यात येतील, या सर्व योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

काहीजण यासाठी बजेटमध्ये तरतूद नसल्याचे म्हणत आहेत मात्र हे कॉर्पोरेशन असल्याने याला तरतुदीची गरज लागत नाही. आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्व हे करीत आहोत. शेवटी प्रत्येक गोष्ट ही मतांसाठी करायची नसते. तर काही गोष्टी मधून समाधान मिळत असते. टीका करणारे टीका करत राहतात‌. आपण कामाला महत्त्व द्यायचं असतं.

त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सिंधू रत्न योजनेअंतर्गत काजू बोंडू प्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव सादर केलेल्या २०० लाभार्थ्यांना तसेच अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १२ बचतगटांच्या माध्यमातून १०० लाभार्थ्यांना मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंजुरी पत्र देण्यात आले. तसेच टेन्ट व निवासी व्यवस्था यासाठीची २०० लाभार्थींना मंजुरी पत्रे देण्यात आली तर फूड सिक्युरिटी आर्मी अंतर्गत ४४ जणांना मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच टसर रेशीम उद्योगासाठी १०० लाभार्थ्यांना अर्ज वाटप करण्यात आले. तर कुक्कुटपालन व गाई पालन व्यवसायासाठी आवश्यक संसाधने व कुक्कुटग्राम यासाठी च्या मंजुरी पत्रांचेही मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आचारसंहितेनंतर उर्वरित प्रस्ताव देखील त्वरित मंजूर करण्यात येतील असे आश्वासन यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

यावेळी सिंधू रत्न योजनेअंतर्गत काजू बोंड प्रक्रिया उद्योग या विषयावर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शक डॉ. ललित खापरे यांनी मार्गदर्शन केले. तर टसर रेशीम निर्मिती प्रक्रिया या विषयावर डॉ. योगेश फोंडे यांनी मार्गदर्शन करीत विस्तृत माहिती दिली. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी तर सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले.