सिलिका वाळूची बिगर परवाना वाहतूक : उंबर्डे येथे चार वाहनांवर दंडात्मक कारवाई

वैभववाडी | प्रतिनिधी : सिलिका वाळूची बिगर परवाना वाहतूक करणा-या चार वाहनांवर ३ लाख ४० हजार इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उंबर्डे येथे वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कणकवलीवरुन कोल्हापूरकडे चार ट्रक सिलिका वाळू भरून जात होते. करुळ घाट बंद असल्याने ही वाहतूक उंबर्डे, भुईबावडा मार्गे सुरू होती. ही चारही वाहने उंबर्डे येथून जात असताना तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी थांबवली. तहसीलदार यांनी चालकांकडे कागदपत्रांची तपासणी केली. तर वाळू वाहतूकीची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सदरची चारही वाहने वैभववाडी तहसील कार्यालय या ठिकाणी नेण्यात आली. चार वाहनांवर प्रत्येकी ७६ हजार ४० रुपये इतकी कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या समवेत तलाठी श्री. बागल, तलाठी श्री. चरापले, तलाठी श्री. कांबळे आदी उपस्थित होते. कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांमध्ये सचिन कुंभार, संतोष लांबोर, विकास मोरे, शैलेंद्र जगताप सर्व राहणार कोल्हापूर यांचा समावेश आहे. सोमवारी रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.