खेडमध्ये डॉ. आंबेडकर सभागृह बांधण्यास मंजुरी

आमदार योगेश कदम यांचा पाठपुरावा, ३ कोटी ४१ लाख ७५ हजार रूपयांची तरतूद
 खेड(प्रतिनिधी) शहरातील शिवतररोड येथील सम्राट अशोकनगर येथे आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यानंतर डॉ. बाबसाहेब आंबेडकर सभागृह बांधण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यासाठी ३ कोटी ४१ लाख ७५ हजार रूपयांची तरतूदही केली आहे. लवकरच सभागृह उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
यापूर्वी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह उभारण्यात आले  होते. या सभागृहात सातत्याने सांस्कृतिक तसेच इतर कार्यक्रम होत होते. मात्र देखभालीअभावी सभागृहाची दुरावस्था झाली होती. नगरप्रशासनाने डागडुजीकडे लक्ष दिले नाही. शिवतररोड परिसरातील रहीवाशांसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नगरप्रशासनाकडे सभागृहाच्या डागडुजीसाठी सातत्याने पत्रव्यवहार करून देखील नगरप्रशासनाने दाद दिली नाही. अखेर धोकादायक स्थितीतील सभागृहाची पडझड झाली.
यामुळे अशोकनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची. नव्याने उभारणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार योगेश कदम यांच्याकडे करण्यात आली होती.
आमदार कदम यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून नवीन सभागृह बांधण्यासाठी निधी देण्याची आर्जव केली. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ३ कोटी ४१ लाख ७५ हजार १९४ रूपयांची तरतूदही झाल्याने सभागृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने शहराच्या इतिहासातील ४८ कोटी ३० लाख रूपयांची नळपाणी योजनाही मंजूर झाली आहे. याशिवाय शिवतररोड नवीन जलवाहिनी परिसरातटाकण्यासाठी आमदार योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने २८ लाख ३५ हजार रूपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे.