स्वखर्चातून रस्त्याचे नामफलक बनवून नातवाने जपली आजोबांची स्मृती

 

राजापूर (वार्ताहर): शहरातील वरचीपेठ येथील रस्त्याचे कै. जावकर बुवा मार्ग असे नामकरण केलेले असताना नामफलकाअभावी ते विस्मृतीत गेले होते. मात्र कै. जावकर यांचे नातू दिनेश जावकर यांनी स्वखर्चातून नाम फलक लावून आपल्या आजोबांची स्मृती जपत एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

वरची पेठ येथील महापुरूष मंदिर ते वरचीपेठ पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याला कै. जावकर बुवा मार्ग असे नामकरण करून तशा नावाचा फलक सुमारे ३० वर्षांपूर्वी नगर परिषदेच्या वतीने लावणेत आला होता.

मात्र कालौघात हा नामफलक जीर्ण होवून तो नष्ट झाला होता. राजापूर नगर परिषदेचेही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आपल्या आजोबांचे नाव असलेल्या या रस्त्याचे नवीन नामफलक बनवून एक प्रकारे आपल्या आजोबांची स्मृती जतन केली आहे. या नामफलकाचे अनावरण नुकतेच कै. जावकर बुवा यांचे नातू दिनेश जावकर व नातसून सौ. नेहा जावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महादेव गोठणकर, प्रकाश (बाळा) तांबट, प्रमोद गाडगीळ, प्रशांत कुवेस्कर, सिदधू पटेल, विजय बाकळकर, पटेल, अनिल पांचाळ आदी उपस्थीत होते. दिनेश जावकर यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. राजापूर नगर परिषदेने शहरातील रस्त्यांचे नामफलक लावून त्या त्या भागातील थोर व्यक्तींच्या कामाचा गौरव करावा अशी मागणी पुढे आली आहे.