लांजा (प्रतिनिधी) राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या संजय यादवराव यांना अखिल भारतीय हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, संजय यादवराव यांच्या मागील पंचवीस वर्ष सामाजिक कार्याची दखल घेत हा पाठिंबा जाहीर केला आहे.
संजय यादवराव हे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. कोकणातील रिकामी होणारी गावे, बंद होणाऱ्या शाळा , वर्षानुवर्ष कोकणातील तरुणांचे मुंबई-पुण्यात होणारे स्थलांतर हे सर्व थांबण्यासाठी गावागावात उद्योग आणि व्यवसाय निर्माण व्हायला हवेत यासाठी संजय यादवराव एकमोठे अभियान चालवत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात मूलभूत विकास होण्यास चालना मिळेल. त्यांच्या कामात प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची भावना दिसते, ज्यामुळे ते जनतेसाठी आदर्श नेता ठरू शकतात.
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या या पाठिंब्यामुळे राजकीय वातावरणात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. मतदारांमध्येही या निर्णयाची चर्चा आहे. कोकणातील शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यवसायिक यांच्या समस्या विधानसभेत मांडण्यासाठी अभ्यास नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून त्यांना या निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन हिंदू महासभेने केले आहे. महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या पाठिंब्यामुळे त्यांना अधिक व्यापक समर्थन मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून, संजय यादवराव यांना निवडणुकीत प्रबळ उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकीमध्ये कोकणातील पहिले मोठे परिवर्तन राजापूर आणि लांजा तालुक्यामध्ये होईल.असा विश्वास शिवस्वराज्य कोकण संघटना सरचिटणीस संदीप शिरधनकर आणि हिंदू महासभेने केला आहे.










