मुख्यमंत्री माझी शाळामध्ये अव्वल
रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी शाळा या ४५ दिवसांच्या पहिल्याच अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरने आता आपला ठसा राज्यातही उमटवावा. सुवर्णपदक विजेते गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांचे विद्यार्थी आज भारत शिक्षण मंडळ सुरेख पद्धतीने चालवत आहेत. यामुळेच पटवर्धन हायस्कूल, आगाशे विद्यामंदिरची घोडदौड सुरू आहे, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध डॉक्टर अलिमियॉं परकार यांनी केले. आज शनिवारी दुपारी हा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात झाला.
मुख्यमंत्री माझी शाळा अभियानातील यशाबद्दल शाळेत आज आयोजित कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुनील पाटील, विस्तार शिक्षण अधिकारी संदीप कडव यांच्यासह भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, चंद्रशेखर करंदीकर, सतीश दळी, धनेश रायकर, पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी आणि विजय वाघमारे, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, माजी मुख्याध्यापिका काळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मदत करणारे पालक, गुणवंत विद्यार्थी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी डॉ. केळकर म्हणाले की, हे यश एका दिवसांत मिळालेले नाही. त्याकरिता अनेक दिवस शिक्षक, पालकांचा वाटा आहे. सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन व जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले. याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो.












