…म्हणून त्यांना निलेश राणे म्हणतात ! – अनघा निकम मगदुम,रत्नागिरी

घरामधे असलेला कौटुंबिक जिव्हाळा आणि घराचा उंबरठा ओलांडला की मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवणाऱ्या राजकीय क्षेत्रात लहानपणापासूनच जडणघडण होत असताना त्यातून योग्य ते निवडत, ज्यांनी कायम साथ दिली त्यांना सोबत घेऊन आयुष्याच्या वाटेवर वाट्याला आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करत दमदार वाटचाल करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते निलेशजी राणे.

आयुष्य प्रत्येकाची परीक्षा घेत असतं. परीक्षेला तोंड देतान कोणी परिस्थितीसमोर हतबल होतं, कोणी मार्ग बदलत तर कुणी आपल्या माणसांची साथ सोडून सोपा सुखाचा मार्ग शोधत. अशी माणसे आयुष्यात पुढे किती यशस्वी होतात हे माहिती नाही पण आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा, चढ उताराचा, वेगवेगळ्या वळणाचा सामना करत जो लढत रहातो, आपली तत्त्व जो विसरत नाही तो नक्की जिंकतोच. निलेशीजी राणे साहेबांचे वर्णन असेच करावेसे वाटते.

खरतर गेली १५ ते २० वर्ष सक्रिय राजकारणात वावरणाऱ्या राणे साहेबांचे बालपणच कोकणचे नेते केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणे यांच्या समवेत त्यांची राजकीय वाटचाल जळवून पाहत गेली. राणे साहेबांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणा देणारेच आहे. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय क्षमता, राजकारण फिरवण्याची ताकद अनेकांना प्रेरणा देते, इथे तर निलेशजीसाठी वडिलांकडून मिळणारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिकवण घरातूनच सुरू होती. त्यामुळे उच्च शिक्षण झाल्यानंतर निलेशजींचे पाय आपसूकच राजकारणाकडे वळले. पण १५- २० वर्षांपूर्वी त्यांची ओळख राणे साहेबांचा मुलगा अशी होती आणि आजही आहेच पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
२००९ नंतर पराभवाचे दोन मोठे अनुभव घेतलेला माणूस या क्षेत्रातून केव्हाच बाहेर गेला असता. पण आजही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील राजकारण निलेशजी राणे यांच्या भोवती फिरते आहे. त्यांची कोणतीही भूमिका स्थानिक आणि पक्षीय राजकारणात महत्त्वाची ठरते आहे. त्यांचं एक ट्वीट काय घडवू शकते याची चुणूक काही महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे.

राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर राजकरण म्हणजे समाजातील लोकांच्या सुख दुःखाची जाण, राजकारण म्हणजे हातात काहीच नसताना संपूर्ण बाजी उलटून लावण्याचे कसब, राजकारण म्हणजे सत्ता, पद नसतानाही परिस्थितीला आपल्याभोवती फिरवू शकेल अशी ताकद, राजकारण म्हणजे सत्ता आणि पदासाठी कुणावर अवलंबून राहणे नव्हे तर राजकारण म्हणजे स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे होय. हेच राजकारण निलेशजी यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधे केले आहे. निलेशजी हे महाराष्ट्रातील तरुणांचे आयकॉन आहेतच पण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हयात आज त्यांची वैयक्तिक ताकद आहे. यापूर्वी त्यांच्या ज्या भूमिकांवर टीका केली जायची तिथे गेल्या अनेक वर्षात फसवणुकीचेअनेक अनुभव घेतलेला कोकणी माणूस निलेशजींचे समर्थन करताना दिसतो आहे.

एकीकडे आपल्या कार्यकर्त्यांसाठी जीवाला जीव लावणारा नेता तर दुसरीकडे कुटुंब वत्सल मुलगा. राजकीय भवितव्य म्हणजे स्वतःच्या सिट साठी कातडी बचावू धोरण स्वीकारत वागणारे या राजकीय पटलावर अधिक आहेत आणि सातत्याने वाढत आहेत पण पदापेक्षा सुद्धा भावनांना प्राधान्य देणारा राजकारणी म्हणजे फक्त निलेश राणेच असतात. अशावेळी ते त्यांच्या राजकीय फायद्या तोट्याबद्दल फारसाविचार करत नाहीत. म्हणूनच एकदा त्यांच्याशी प्रामाणिकपणे बांधलेला माणूस कधीच दूर होत नाही, म्हणूनच आपल्या पित्याची टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणाऱ्या निलेशजींच्या भूमिकेचे अनेक स्तरातून समर्थन होते, म्हणूनच निलेशजी हेच आपला नेता असावे यासाठी सच्चा कार्यकर्ता तळमळत असतो.
आपल्या छोट्याशाच राजकीय कारकिर्दीत लहान वयातच कोणीही पाहिले नसतील असे टोकचे चढ उतार पाहणारे निलेशजी राणे नव्या वाटचालीसाठी सज्ज झाले आहेत. त्यांची ही वाट सोनेरी यशाने उजळून निघो या सदिच्छांसह निलेशजी राणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !