खेड(प्रतिनिधी) खेड शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कोणत्याही क्षणी सेवेत येणाऱ्या व्यत्ययामुळे संवादाची देवाणघेवाण करण्यास अडथळे निर्माण होत आहे. खंडित होणाऱ्या सेवांमुळे ग्राहक अक्षरशः मेटाकुटीसच आले आहेत. याबाबत नेमकी तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्नही ग्राहकांना सतावत आहे
यापूर्वी बीएसएनएल सेवेचा गाजावाजा होता मात्र बीएसएनएल सेवेचेही पुरते तीनतेराच वाजल्याने ग्राहकांनी पाठ फिरवत. खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा खरेदी केली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खासगी मोबाईल ग्राहकांवर सवलतींची खैरात देखील कंपन्यांनी केली. यामुळे अनेक ग्राहकांनी खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा खरेदी केली. सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर मात्र खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवांमध्ये देखील व्यत्यय येण्यास सुरूवात झाली. गेल्या काही महिन्यांपासून जिओसह एअरटेल मोबाईल. कंपन्यांच्या सेवेत व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही क्षणी सेवा खंडित होत असल्याने संवादाची देवाणघेवाण करण्यास अडथळे निर्माण होत आहेत.










