मयुर ठाकूर ( कणकवली ) : आंगणेवाडी येथील भराडीदेवीचा यात्रोत्सव व कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले होते. या दोन्ही यात्रोत्सवांच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला ५२ लाख ११ हजार ३८५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न २ लाख ९२ हजार ८०० रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला उत्पन्नाच्या माध्यमातून बूस्टर डोस मिळाला आहे.
मालवण तालुक्यातील आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी सिंधुदुर्ग विभागातून एसटी बसच्या १४०६ फेऱ्या सोडण्यात आलेल्या होत्या. या फेऱ्यांच्या माध्यमातून या विभागाला २३ लाख ६१ हजार ६५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. जादा गाड्यांमधून ७२,२६३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. गतवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवातून सिंधुदुर्ग विभागाला २४ लाख ४२ हजार ९०५ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८१ हजार २५० रुपयांचे उत्पन्न कमी मिळाले आहे.
मात्र, कुणकेश्वर यात्रोत्सवातून यावर्षी अधिक उत्पन्न मिळाले आहे. यावर्षी कुणकेश्वरसाठी एसटी बसच्या ११८४ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून २८ लाख ४९ हजार ७३० रुपयांचे उत्पन्न मिळाले. यातून ६८ हजार २३८ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. गतवर्षी कुणकेश्वर यात्रोत्सवाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग विभागाला २४ लाख ७५ हजार ६८० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३ लाख ७४ हजार ५० रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाले आहे.
कुणकेश्वर यात्रेतून झालेले उत्पन्न
मालवण आगार ( फेऱ्या ३०२, उत्पन्न ५,४२,५५४ ), कणकवली आगार ( फेऱ्या ३२४, उत्पन्न १२.२६.०५२ ), देवगड आगार ( फेऱ्या ५१८, उत्पन्न १०,०६,६५२ ), विजयदुर्ग आगार ( फेऱ्या ४०, उत्पन्न – ७४,४७२ ), अशा मिळून एकूण ११८४ फेऱ्या झाल्या तर त्यातून एकूण २८,४९,७३० उत्पन्न मिळाले.
आंगणेवाडी यात्रेतून झालेले उत्पन्न
सावंतवाडी आगार ( फेऱ्या ७४, उत्पन्न १,४४,३८६ ), मालवण आगार ( फेऱ्या ६३३, उत्पन्न ६,१४,१०३ ), कणकवली आगार ( फेऱ्याा १९६, उत्पन्न ४,९८,६१५ ), देवगड आगार ( फेऱ्या१२९, उत्पन्न २,७८,३६७ ), विजयदुर्ग आगार ( फेऱ्या ५०, उत्पन्न १,२८,१२२ ), कुडाळ आगार ( फेऱ्या २१८, उत्पन्न ५,२४,३९३ ), वेंगुर्ले आगार ( फेऱ्या १०६, उत्पन्न १,७३,६६९ ) अशा मिळून एकूण १४०६ बस फेऱ्या झाल्या व त्यातून २३,६१,६५५ एवढे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती, एसटीच्या विभाग नियंत्रकांकडून देण्यात आली.












