चिपळूण (प्रतिनिधी) : गोवळकोट रोड, गोवळकोट रस्त्या लगत उंच झाड आहे. या झाडाच्या फांद्या विज ताराना लागत असल्याने नागरिकांना व वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच झाडावर बसणारे पक्षी परिसर अस्वच्छता करत असल्याने तात्काळ हे झाड तोडावे, अशी मागणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी चिपळूण नगरपरिषद यांच्याकडे केली आहे.
गोवळकोट रोड, गोवळकोट हे वर्दळीचे ठिकाण आहे. या मार्गावरून चिपळूण बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, गुहागर व मुंबई असे अनेक रस्ते जोडले जात असल्याने कायम रहदारी असते. तसेच काही दिवसातच कोकणातील प्रसिद्ध असलेला सण शिमगा उत्सव सुरू होणार आहे. मापातली करंजेश्वरी पालखी याच रस्त्यावरून जात असल्याने मुंबईहून हजारो लोक शिमग्याला गावी येतात. या झाडांमुळे परिसर अस्वच्छता होत असल्याने तात्काळ झाडाच्या फांद्या तोडण्यात यावे अन्यथा आपण आपल्या पद्धतीने फांद्या तोडू, असा इशारा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी दिला आहे.











