चिपळूण (वार्ताहर) : श्रीमती रुक्मिणीबाई माटे शिक्षण संस्था कामथेचे नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डुगवे- शिरवली या विद्यालयामध्ये सुरेंद्र वैद्य यांचे “चला छोटे संशोधक होऊ या ” या विषयावर व्याख्यान पार पडले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयी कुतुहल विकसित करताना सुरेंद्र वैद्य यांनी आपल्या व्याख्यानातून शास्त्रज्ञ कसे संशोधन करतात यासाठी आवश्यक जिद्द, संयम याबरोबरच ज्ञान, कौशल्य व वृत्ती याबद्दल स्वानुभवातून विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना एखादे कौशल्य विकसित करण्याची गरज अधोरेखीत करताना विविध उदाहरणे दिली. गोदरेज एरोस्पेसचे भूतपूर्व मुख्य व्यवस्थापक सुरेंद्र वैद्य यांना इस्त्रोमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती , शास्त्रज्ञ डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत जवळपास १२ वर्षे काम करण्याचे भाग्य लाभले. या कालावधीतील काही किस्से, अनुभव सुरेंद्र वैद्य यांनी कथन केले. निवृत्तीनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी स्वनिधीतून विविध शाळातून जवळपास आठ कार्यशाळा त्यांनी उभारल्या आहेत. या कार्यशाळेतून इलेक्ट्रिक, प्लंबिंग, स्प्रे पेंटींग, तारतंत्री, ब्युटी पार्लर, पंप पाईप फिटींग अशा विविध कोर्सेसचे मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी आवडीनुसार एखादे कौशल्य विकसिक करून स्वतःच्या विकासाबरोबर कुटुंब, समाज पर्यायाने देशाच्या विकासामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आपल्या व्याख्यानातून सुरेंद्र वैद्य यांनी केले.
सुरेंद्र वैद्य यांचे मौलीक विचार, गुढे- शिरवली गावातील शिक्षणप्रेमी विनय तांबे यांच्या सहकार्यातून व संस्था अध्यक्ष डॉ. विजय माटे यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऐकावयास मिळाले. या कार्यक्रमाला विनयज तांबे, शालेय समिती चेअरमन सौ. माधुरी गोखले, मुख्याध्यापक संदेश कोकाटे, श्री. झोरे, श्री. जाधव, श्री. तावडे, सौ. डाकरे, सौ. कदम, श्रीम. तावडे, एकनाथ भडवळकर, श्रीम. मानसी चिले उपस्थित होते.












