लेदर बॉल क्रिकेट सरावासाठी बोर्डिंग ग्राऊंड मालवण येथे बांबू- नेटने कव्हर्ड पाच टर्फ खेळपट्ट्या

 

माजी क्रिकेटपटू रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते शुभारंभ

अमित खोत | मालवण : मालवण बोर्डिंग ग्राऊंड येथे लेदर बॉल क्रिकेट सरावासाठी नवीन पाच खेळपट्ट्या बनविण्यात आल्या आहेत. या खेळपट्ट्यांचा शुभारंभ उद्योजक तथा ज्येष्ठ खेळाडू रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.

मालवण मध्ये उदयोन्मुख होतकरू क्रिकेट खेळाडू, शालेय विद्यार्थी यांना क्रिकेटचा सराव करण्यासाठी या अगोदर तीन क्रिकेट खेळपट्ट्या उपलब्ध होत्या. मात्र त्या मैदानाच्या सीमारेषेच्या आतमध्ये होत्या, तसेच त्या सरावाच्या खेळपट्ट्या या पूर्णपणे जाळीने कव्हर्ड नसल्यामुळे मैदानावर क्रिकेट मॅच सुरु असताना खेळाडूंना मैदानावर सराव करता येत नव्हता. आता तयार केलेल्या पाच उत्कृष्ट दर्जाच्या सरावाच्या खेळपट्ट्या या मैदानाच्या सिमारेषेच्या बाहेर तयार करण्यात आल्यामुळे आणि त्या नेटने पूर्णपणे कव्हर्ड केल्यामुळे खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेट सराव करण्याची पूर्णपणे बंदिस्त सुविधा निर्माण झाली आहे.

क्रिकेटचा सराव करण्यासाठी पाच खेळपट्ट्या तयार करण्याचे काम हे मागील सहा महिन्यापासून सुरू होते. सरावाच्या पाच विकेट बनविताना प्रथम ती जागा निश्चित करून त्यावरील रानगवत काढण्यात आले आणि साधारण दोन फुटाचा खड्डा खणून त्यामध्ये बोल्डर, विटा भरून मजबूत पाया तयार करण्यात आला. त्यावर लाल मातीचा भराव टाकून त्या जमिनीपासून सहा इंचवर घेऊन समपातळीत करण्यात आल्या. हेव्ही रोलरने रोलिंग करून त्यावर बर्मुडा सिलेक्शन वन जातीचे गवत लावण्यात आले आहे. मागील चार महिन्यांपासून त्याची जोपासना करण्यात आल्यानंतर आता या दर्जेदार खेळपट्ट्या सरावासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

डॉ. शिरिष कदम यांनी सरावाच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी बहुमोल सहकार्य केले. उद्योजक तथा ज्येष्ठ खेळाडू रुजारिओ पिंटो यांनी जाळी उपलब्ध करून दिली असून खेळपट्ट्या बांबूचा वापर करून जाळ्याने बंदिस्त करण्यासाठी दिपक धुरी यांनी विशेष मेहनत घेतली. सरावाच्या खेळपट्ट्या ग्राउंड्समन धर्मेंद्रकुमार यांनी विशेष मेहनत घेऊन तयार केल्या असून त्यांना संजय राऊत आणि गावकर यांनी मदत केली.

सरावासाठी दर्जेदार खेळपट्ट्या उपलब्ध झाल्यामुळे खेळाडू, क्रिकेटप्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनला १४,१६,१९ आणि सिनियर मुलगे आणि मुलींची निवड चाचणी आणि त्यांना सराव करण्यासाठी नेट प्रॅक्टिस विकेट उपलब्ध करून द्याव्यात असे ज्येष्ठ खेळाडूंनी मत व्यक्त केले. क्रिकेट खेळाडूंना रात्रीची सुध्दा नेट प्रॅक्टिस करण्यासाठी फ्लड लाईटस् सुविधा लवकरच निर्माण करून देण्यात येणार आहे. यावेळी दादा धुरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, ‘कै.विलास बांदिवडेकर सरांच्या स्मरणार्थ फेब्रुवारी महिन्यात क्रिकेट स्पर्धा आयोजित करताना त्यांची सुकन्या मिथाली बांदिवडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्या शालेय क्रिकेट स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचे एप्रिल, मे महिन्यात या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात यावे तसेच त्या शाळांना नेट प्रॅक्टीस करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे मेहनत करून तयार करण्यात आलेल्या या खेळपट्ट्यावर सराव करून भविष्यात एखादा खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करू शकेल आणि या सराव खेळपट्ट्या तयार करण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल’.

ज्या होतकरू क्रिकेट खेळाडूंना, प्रशिक्षकांना, माजी वरिष्ठ खेळाडूंना, शाळांना,क्लब्जना या सराव खेळपट्ट्यांवर नेट प्रॅक्टीस करायची असेल त्यांनी जयंत गवंडे, विलास परुळेकर आणि रेनॉल्ड बुथेलो यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनचे बबन रेडकर,जयंत गवंडे,विलास परुळेकर,अजित उर्फ पिंकू मोरे,सिद्धार्थ जाधव,आप्पा मालंडकर तसेच मालवणमधील ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू रामा शेटये, दिलीप मांजरेकर, भाई खराडे, नरी चिंदरकर, जगदीश नेवाळकर, नितीन वाळके, दादा धुरी, अमेय मांजरेकर, श्याम वाक्कर, मंदार ओरसकर, अमित कारेकर, वायंगणकर मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक निशिकांत पराडकर सर व राणे सर, आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक प्रशिक्षक सुहास लोहार आणि त्यांचा सहाय्यक सत्यम चौरसिया, मालवण स्पोर्टस क्लबचे सौरभ ताम्हणकर, गौरव लुडबे, सुशील शेडगे, संदीप पेडणेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, निश्चय पालेकर, अमु हर्डीकर, मालवण स्पोर्टस असोसिएशनचे नंदन देसाई, विक्रम मोरे, पप्पू परब, नीळकंठ मालणकर, उमेश मांजरेकर, दीपक धुरी, प्रफुल्ल धुरी, रिझवान शेख, जितेंद्र वाळके, सचिन पालव, प्रशिक्षक संदीप उर्फ मार्शल शिरोडकर आदी उपस्थित होते.