प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजाचे तहसीलदारांना निवेदन सादर
लांजा( प्रतिनिधी) शासनाने निर्गमित केलेल्या संच मान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या सुधारित निकषास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजाने ठाम विरोध केला असून याबाबतचे निवेदन आज शुक्रवारी २२ मार्च रोजी सायंकाळी लांजा तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, संच मान्यतेच्या शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी प्रमाणात शिक्षक संख्या ठरविण्यासाठी संच मान्यतेचे सुधारित निकष सुधारित केले आहेत. हे निकष लागू झाल्यास शेतकरी, शेतमजूर ,कष्टकरी, कामकरी शोषित, वंचित ,गरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण लयाला जाण्याची व शिक्षण मिळण्याची सुविधा नष्ट होईल. त्याचप्रमाणे शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरतील, अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आमची ठाम धारणा आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षक समिती सारख्या संघटनात नव्हे तर पालक वर्ग तसेच विविध शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या शासकीय व अशासकीय संघटना, संस्था यांच्यादेखील नवीन संच मान्यताला कडाडून ठाम विरोध आहे .सदर शासन निर्णय हा चुकीचा असून न्यायसंगत नाही.
आणि म्हणूनच बालकांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सदर निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करणे तसेच गुणवत्ता संवर्धन साधण्यासाठी प्रत्येक वर्गाला पुरेसे नियमित शिक्षक उपलब्ध करून देणे ही शासनाचे संवैधानिक आणि सामाजिक दायित्व आहे. याचा विचार करून आचारसंहिता संपताच धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप दिवाळे, सचिव दिनेश झोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.











