देवाचे गोठणे येथे जल जीवन मिशन योजनेच्या कामात भ्रष्टाचार?

अंदाज पत्रकानुसार काम झाले नसल्याची ग्रामस्थांची तक्रार

माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली दखल

राजापूरसह जिल्हयातील सर्व जलजीवनच्या कामांचे होणार ऑडीट

योग्य कारवाई होईपर्यंत करणार पाठपुरावा

राजापूर (प्रतिनिधी): हर घल जल चा नारा देत शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी कोटयावधी रूपये खर्चुन हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशनचे योजनचा रत्नागिरी जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांनी परस्परांशी हातमिळवणी करून या योजनेच्या माध्यमातुन आपले उखळ पांढरे करून घेतले असून याबाबत आता त्या त्या गाव व वाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत या योजनेंतर्गत झालेल्या दर्जाहिन कामांची पोलखोल केली आहे. राजापूर तालुक्यात देवाचे गोठणे गावात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेचे काम निकृष्ठ झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

 

प्रत्यक्षत या या योजनेचा लाभ जनतेला होण्याऐवजी अधिकारी आणि ठेकेदार यांनीच घेतला असून स्थानिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्हयात सुरू असलेल्या अनेक कामांबाबत यापुर्वीच माजी खासदार निलेश राणे यांनी आवाज उठविलेला असून आता पुन्हा एकदा राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे गावातील या योजनेंतर्गत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी पुढे येताच निलेश राणे यांनी पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हयात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत कामाचे ऑडिट करण्याची मागणी करत या सर्व कामांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सध्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल ही योजना राबवली जात आहे. यासाठी कोटयावधींचा निधी खर्च केला जात आहे. मात्र या योजनेची होणारी निकृष्ठ कामे, त्रुटी पाहिल्यावर ही योजना नेमकी कोणासाठी? सर्वसामान्य जनतेला पाणी मिळावे यासाठी की लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भल्यासाठी असा जनतेचा सवाल आहे.

 

राजापूर तालुक्यातही ११० कोटीच्या १९८ योजना मंजूर झालेल्या आहेत. यातील काही योजना पुर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र अनेक योजनांची कामे ही निकृष्ठ दर्जाची असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. राजापूर तालुक्यात देवाचे गोठणे भागात या योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र असे असतानाही अधिकारी व ठेकेदार यांनी त्याकडे दुर्लक्ष करत काम पुर्ण झाल्याचे दाखवत बिलही अदा केल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. प्रत्यक्षात अंदाजपत्रका प्रमाणे कामच झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यासह अशा तालुक्यातील अनेक योजनांच्या कामांबाबत स्थानिक जनतेच्या तक्रारी आहेत. या योजनांचे ठेकेदार नेमका कोण, प्रत्यक्षात काम करतो कोण, काम पूर्ण होण्याअगोदर पूर्ण बिल काढून कसे होते असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.

 

राजापूर तालुक्यातील या एकूणच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे. तर या एकूणच जिल्हयातील जल जीवन मिशनच्या कामांबाबत खुद्द माजी खासदार निलेश राणे यांनी दखल घेत चौकशीची मागणी करतानाच कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिल्याने आता अधिकाऱ्यांसह ठेकेदार आणि यात हात ओले करून घेणारे काही लोकप्रतिनिधी यांचे धाबे दणाणले आहेत.