चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या मांडकी पालवण येथील भव्य क्रीडांगणावर आयोजित, शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या संमेलनाच्या भव्य मंडप उभारणीचा उद्घाटन सोहळा आज, गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उत्साहात संपन्न झाला. संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला.
या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, स्मरणिका छपाई समितीच्या अध्यक्षा सौ. अंजली चोरगे आणि कोषाध्यक्ष अजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मांडकी परिसरातील वातावरण आता साहित्यिक व सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघण्यास सुरुवात झाली असून, मंडप उभारणीच्या निमित्ताने संमेलनाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळाली आहे.
याप्रसंगी संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार समिती प्रमुख डॉ. शमिका चोरगे, संस्थेचे सचिव श्री. मिलिंद सुर्वे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्राचार्य सचिन तांबेकर आणि रावसाहेब सुर्वे यांसह विविध समित्यांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. शासनाचे सहकार्य लाभलेले हे राज्यस्तरीय संमेलन ग्रामीण, कृषी आणि सहकार अशा विविध विषयांवर प्रकाश टाकणारे ठरणार असून, त्याची तयारी आता युद्धपातळीवर सुरू असल्याचे संयोजन समितीकडून सांगण्यात आले.












