रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग विभागाला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी फाउंडेशन) तीन व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आला. या व्हीलचेअरचा उपयोग बाहेरील तालुक्यातून जिल्हा रुग्णालयात तपासणी, विविध प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी होणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग विभागात दर बुधवार आणि शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांची तपासणी करून त्यांना अपंग प्रमाणपत्र काढून देण्यात येते. दिव्यांग खूप लांबून वेळ काढून येतो. पण त्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी रुग्णालयामध्ये केसपेपर काढण्यासाठी, एक्स रे काढण्यासाठी, गरजेप्रमाणे रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागते. काही दिव्यांग हातावर चालतात, तर काहींना चालताही येत नाही. त्यांचे पालक त्यांना उचलून आणतात. अशा दिव्यांगांना सर्व विभागात फिरण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्राचे काम एकाचवेळी पूर्ण होत नाही आणि त्यांना दोन- तीन हेलपाटे घालावे लागतात.
दिव्यांग विभागात व्हीलचेअरची कमतरता असल्याचे आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिकभाई नाकाडे व सदस्यांना जाणवले. दिव्यांगांचे आणि त्यांच्या पालकांचे खूप हाल होतात. दिव्यांगांचा त्रास कमी व्हावा आणि त्यांच्या पालकांचाही शारीरीक व अर्थिक त्रास कमी व्हावा या उद्देशाने व्हीलचेअर दिली. संस्थेने देणगीदार शोधून दिव्यांग विभागासाठी नवीन व्हीलचेअर मिळवून द्यायचे ठरविले. त्यामुळे दिव्यांगांना वेळेत प्रमाणपत्र काढून मिळण्यासाठी खूप फायदा होणार आहे. त्याप्रमाणे आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी देणगीदार मिळवून दिव्यांग विभागात तीन नवीन व्हीलचेअर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सुपुर्त केल्या. त्यावेळी वैद्यकिय समाजसेवा अधीक्षक अरुण खाकर, ऑर्थोपेडीक डॉक्टर मयुर कुंभार, फिजिओथेरपिस्ट डॉ. नितीन चौके आणि डॉ. अमित वायंगणकर, आरएचपी फाउंडेशनचे सदस्य समीर नाकाडे आणि प्रिया बेर्डे उपस्थित होते.