आबलोली l वार्ताहर :चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.कमी खर्च व उपलब्ध संसाधनांचा योग्यरित्या परिपूर्ण वापर ही आधुनिक शेतीची प्रमुख उद्दीष्टे समोर ठेवुन या विद्यार्थ्यांकडून सेंद्रिय शेती प्रकल्प हाती घेण्यात आला.सुमारे २० गुंठे क्षेत्रावर या विद्यार्थ्यांकडून विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे.यामध्ये कलिंगड, चवळी,लाल माठ,कोथिंबीर व झेंडु आदी.चा समावेश आहे. स्थानिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडून या पिकांची निवड करण्यात आली आहे.ह्या पिकांपासुन अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी या विद्यार्थ्यांकडून शेणखत,कोंबडी खत,जिवामृत तसेच विविध जैविक घटकांचा वापर करण्यात आला आहे यामध्ये ट्रायकोडारमा,सुडोमोनासचे कल्चर,ह्युमिक आम्ल,हळद,तंबाखु, दशपर्णी,बेसन ई.चा समावेश आहे .विशेष बाब म्हणजे ट्रायकोडारमा,सुडोमोनासचे कल्चर विद्यार्थ्यांकडून स्वत: बनवण्यात आले आहे.
वरील सर्व पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आहे.उन्हाळ्यामधील पाण्याची कमतरता लक्षात घेऊन ठिबक सिंचन व मल्चिंग यांचे संयोजक विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.कोकणात सेंद्रिय शेतीचा हा यशस्वी प्रयोग हे स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे.स्थानिक पातळीवर या प्रकल्पातील कलिंगड,झेंडु,लाल माठ व कोथिंबीरीला मोठी मागणी मिळत आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व प्रकल्प अधिकारी प्रा.महेश घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.











