वस्त्रहरण नाटकातील ‘गोप्या ‘ ची अकाली एक्झिट 

 

अभिनेते लवराज कांबळी यांचे अल्पशा आजाराने निधन 

 

मालवण : मालवणी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार रोवणाऱ्या ‘वस्त्रहरण ‘ या गाजलेल्या नाटकातून ‘गोप्या ‘ च्या अजरामर भूमिकेतून ज्यांनी महाराष्ट्राला खदाखदा हसवलं ते अभिनेते लवराज कांबळी यांचं आज मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मालवण तालुक्यातील रेवंडी गावचे सुपुत्र असलेल्या लवराज कांबळी यांचे नाट्य क्षेत्रात मोठे योगदान राहिले होते. नाट्यनिर्मिती व अभिनय क्षेत्रात त्यांनी अलौकिक कार्य केले होते.

तीन वर्षांपूर्वी त्यांची पत्नी अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे निधन झाले होते. गिताजंली कांबळीच्या निधनानंतर आपल्या जगण्याची लढाई दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हसत हसत पार करणारा प्रवास आज शांत झाला. गीतांजली कांबळी यांच्या निधनानंतर लवराज यांनी गीतांजली प्रोडक्शनच्या माध्यमातून नाट्य निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘माझ्या देवाक काळजी रे ‘ हे गीतांजली प्रोडक्शन चे नाटक फार गाजले होते.

अभिनय क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. वस्त्रहरण, येवा कोकण आपलाचा आसा, चंपू खानावळीण, देवाक काळजी, वडाची साल पिंपळाक अशा नाटकांच्या माध्यमातून लवराज कांबळी यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाची छाप सोडली होती. शेम टू शेम या लक्ष्मीकांतच्या सिनेमात लवराज यांनी केलेली भूमिका ही यादगार ठरली होती.

लवराजची खरी ओळख निर्माण झाली ती वस्त्रहरण मधील गोप्याच्या भूमिकेमुळे. लवराजच्या आधी दिलीप कांबळी कायिक अभिनयाने गोप्या सजवायचे. लवराजने त्याला वाचिक सौंदर्य दिले होते. त्यांच्या निधनामुळे नाट्यक्षेत्रात सिंधुदुर्गची वेगळी ओळख निर्माण करणारा तारा निखळला, अशा शब्दात त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, भाऊ, भावजयी, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रसिद्ध नेपथ्यकार अंकुश कांबळी यांचे भाऊ तर रंगभूषाकार व मूर्तिकार तारक कांबळी यांचे काका होत.