वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांची चालवा !

कोकण विकास समितीचे निवेदन

खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अलिशान मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असून अल्पावधीतच एक्सप्रेस कोकणवासियांच्या पसंतीस उतरली आहे. एक्सप्रेस केवळ ८ डब्यांची धावत असल्याने कोकणवासियांचा हिरमोड होत आहे. वंदे भारत एक्सप्रेस कोकण मार्गावर ८ऐवजी १६ डब्यांची चालवण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.

कोकण मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावू लागल्यापासून कोकणवासियांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. सणांच्या कालावधीत असंख्य प्रवाशांना प्रतीक्षा यादीवरच रहावे लागत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमधील अद्ययावत सुविधांसह आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कमाईतही तितकीच भर पडत आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या हाऊसफुल्लच धावत आहेत. अधिकचा भार असतानाही प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. मात्र, वदे भारत एक्सप्रेस केवळ ८ डब्यांची धावत असल्याने आसनांच्या कमतरतेमुळे प्रवाशांची गैरसोयच होत आहे.

एक्सप्रेसला प्रवाशांचा मिळत असलेला लक्षणीय प्रतिसाद लक्षात घेता एक्सप्रेस ८ डब्यांऐवजी १६ डब्यांची चालवण्यात यावी. यापूर्वीही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्र्यांनाही निवेदने देण्यात आली आहे. या प्रस्तावाचा गांभिर्यानि विचार करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणीही करण्यात आली आहे.