पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविणारे चोरटे अखेर गजाआड 

दोन्ही चोरट्यांना मंगळवारी 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

लांजा( प्रतिनिधी) पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून मोटरसायकलवरून पशार झालेले चोरटे अखेर लांजा पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांना न्यायालयाने त्यांना दोन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. ही घटना शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास वाटुळ दाभोळे मार्गावर भांबेड पवारवाडी येथे घडली होती.

सौ नम्रता चंद्रकांत कोकाटे (व ५३, राहणार भांबेड वळणवाडी) ही महिला दिनांक १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या मुलीची सासू शारदा बाळकृष्ण बागवे यांच्याकडे वाटूळ ते दाभोळे जाणाऱ्या रोडने चालत असताना भांबेड पवारवाडी येथे जयराम पवार यांच्या घरासमोर काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघाजणांनी पैकी एका इसमाने नम्रता कोकाटे याच्या पाठीमागून त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून नेले होते. त्यानंतर हे चोरटे मोटरसायकल वरून भांबेडमार्गे पळून गेले होते .

या घटनेतील चोरटे अब्दुल मौला मुल्ला( वय २० वर्षे) आणि निखिल रानू बागडी (वय २० वर्षे राहणार धनगरगल्ली गणेशनगर ,रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर) अशी या दोघा चोरट्यांची नावे असून कोल्हापूर पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. तपासा दरम्यान त्यांना शनिवारी ३० मार्च रोजी लांजा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले होते. पोलीस तपासात त्यांनी भांबेड येथील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा कबूल केला. त्यांना लांजा न्यायासमोर उभे केले असता लांजा न्यायालयाने दोन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.