उन्हाळी सुट्टीसाठी खेड बसस्थानकातून जादा बसफेऱ्या

उन्हाळी सुट्टीसाठी नियोजन, ग्रामीण भागातील फेऱ्या बंद ठेवणार
 खेड (प्रतिनिधी) खेड बसस्थानकातून उन्हाळी सुट्टीसाठी १ एप्रिल पासून लांबपल्ल्याच्या मार्गांवर ६ जादा बसेस सोडण्यास प्रारंभ झाला आहे. शाळा-महाविद्यालयांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
१५ एप्रिलपासून शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्ट्या पडण्यास सुरूवात होणार असल्याने उन्हाळी सुट्ट्यांसाठी जादा बसेस चालवण्यासाठी आगार सज्ज झाले आहे. आगाराने मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, कल्याण, आंबेजोगाई, लातूर, चिंचवड, कोल्हापूर, स्वारगेट, विठ्ठलवाडी, भांडूप, विरार, वसई आदी लांबपल्ल्यांच्या मार्गांवरील २५ नियमित फेऱ्यासह ६ जादा बसेस सोडल्या आहेत.
यामध्ये सकाळी ६.३० वाजता खेड-तुळशी बोरिवली, सकाळी ९.३० वाजता खेड-बोरिवली, सकाळी १०.१५ वाजता शिवतर- खेड-बोरिवली, १०.३० वाजता खेड- भांडुप, दुपारी १.१५ वाजता खेड- ठाणे व रात्री ९.३० वाजता खेड-  बोरिवली जादा बसफेरीचा समावेश असून या फेऱ्या दिवसाकाठी २९२० कि.मी.चे अंतर कापत आहेत.
 शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या पडल्यानंतर आणखी जादा बसेस सोडण्यावर व्यवस्थापनाचा भर राहणार असून यादरम्यान ग्रामीण भागातील ११०० कि.मी.च्या फेऱ्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.