खेड(प्रतिनिधी) तब्बल दोन वेळा भूमिपूजनही करूनही असगणी (ता. खेड) येथील रस्त्याचे काम थांबलेले होते. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रहार मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीजवळील असगणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम डिसेंबरअखेर सुरू करण्यात आले होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेले काम रस्ता खोदाई करून, काही ठिकाणी गटार बांधून ठेकेदाराने अचानक हे काम थांबविले होते. या कामाबाबत प्रहार ने वृत्त प्रसिद्ध करताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
शाळकरी विद्यार्थी, कामगार, प्रवासी व रुग्णांना होत असलेल्या धुळीच्या त्रासाबाबत वस्तुस्थिती समोर आणली होती. त्या वृत्ताची दखल घेऊन हे काम ठेकेदाराने पुन्हा सुरू केले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम दर्जेदार स्वरूपात व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.










