
ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन सोहळा संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी : २१ दिवस भक्तांना दर्शन दिल्यानंतर सावंतवाडी शहरातील सार्वजनिक गणपतींना ढोल-ताशांच्या गजरात आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सुरुवातीला पावसाचा व्यत्यय असूनही गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” च्या जयघोषाने मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.
विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण
यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते. उभाबाजार येथील मारुती, वैश्यवाडा येथील भवानी आणि सालईवाडा येथील नरसिंह अवतार हे देखावे विशेष लक्षवेधी ठरले. तसेच, ढोल-ताशा पथके, हलगी आणि बेंजोच्या निनादाने मिरवणुकीत जोश भरला. महिलांनी सादर केलेली फुगडी आणि वारकरी भजनांनी विसर्जन सोहळ्याला एक वेगळीच धार्मिक किनार दिली.
पावसाचा व्यत्यय, उत्साहात भर
दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे सुरुवातीला मिरवणुकीत काहीसा व्यत्यय आला. मात्र, हातात छत्र्या आणि रेनकोट घालून गणेशभक्त मोठ्या संख्येने सामील झाले. रात्री उशिरा पावसाने विश्रांती घेतल्यानंतर वातावरणात आणखी उत्साह संचारला. गणेशभक्त, युवक आणि महिला ढोल-ताशांच्या तालावर बेभान होऊन नाचत होते. मोती तलावाच्या काठी हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
भक्तिमय वातावरणात मूर्तींचे विसर्जन
तळकोकणातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा, उभाबाजार हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळ आणि वैश्यवाडा हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या २१ दिवसांच्या गणपतींना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. शेवटी, रात्री उशिरा मोती तलावामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले.













