लांजा (प्रतिनिधी) भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक प्रमुख व माजी आमदार प्रमोद जठार हे दि. १४ व १५ एप्रिल रोजी लांजा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गण निहाय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या सर्व क्षमतांनीशी ‘लोकसभा निवडणूक २०२४’च्या मैदानात उतरले आहेत.
प्रमोद जठार हे तालुक्यातील विधानसभेतील प्रत्येक पंचायत समिती गणात महायुतीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणार आहेत. यासाठी ३०० ते ४०० कार्यकर्त्यांच्या छोटेखानी बैठका घेऊन पक्षाची भूमिका, अंत्योदयाची संकल्पना, राष्ट्रीय सुरक्षा, कृषी, महिला आणि युवा कल्याण तसेच आत्तापर्यंत कोकणाची झालेली उपेक्षा आणि त्यावर समाधान देणारा महायुतीचा खासदार याबाबत कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणार आहेत.
दि. १४ एप्रिल रोजी राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात सकाळी १०.३० वाजता भांबेड, दुपारी १२.३० वाजता वाकेड, ३ वाजता साठवली, ४.३० वाजता खानवली, सायंकाळी ६ वाजता गवाणे, ७.३० वाजता लांजा शहरातील भाजपा कार्यालयात बैठक होणार आहे. तर दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रभानवल्ली, दुपारी १२.३० वाजता आसगे दुपारी ३ वाजता वेरवली, सायंकाळी ५ वाजता दाभोळे व ७.३० वाजता कोंडगाव साखरपा या पंचायत समिती गण निहाय बैठका होणार आहेत.
या संपूर्ण दौऱ्यात राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव, महिला मोर्चा लोकसभा संयोजिका सौ. शिल्पा मराठे, सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई, जिल्हा उपाध्यक्ष महेश (मुन्ना) खामकर, जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, अमित केतकर, युवा मोर्चाचे लोकसभा संयोजक संजय यादव, लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, महिला मंडळ अध्यक्षा परिणीता सावंत, लांजा शहर अध्यक्ष गुरुप्रसाद तेली, महिला शहर अध्यक्षा संपदा कुरूप आदी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.










