तीन दिवस मृत्यूशी झुंज अपयशी
राजापूर वार्ताहर : जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (४२, रा. वरचीपेठ) यांचे शनिवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते.
बुधवारी रात्री आपल्या घरी जात असताना वरचीपेठ येथील शासकीय विश्रामगृहाखालील वळणावर त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
घटनास्थळाहून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने अपघाताची माहिती एस.टी. डेपो परिसरातील युवकांना दिली. त्यानंतर युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तांबडे यांच्या अंगावर दुचाकी पडलेली होती व ते गंभीर जखमी अवस्थेत आढळले. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना प्राथमिक उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अमृत तांबडे हे राजापूरच्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील राजापूर मतदारसंघातून लढवल्या होत्या. सध्या ते ज्योतिष व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने राजापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.












