महिला रुग्ण कक्ष व प्रसूती कक्षात भेट देत घेतली माहिती
आरोग्य सेवा व कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोल्हापूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धडक देत येथील कामकाजाची पाहणी केली. विशेष म्हणजे येथील प्रसूती कक्ष तसेच महिला रुग्ण कक्ष व लेबर रूमला भेट देऊन त्यांनी रुग्णांच्या तसेच मातांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेत समस्या जाणून घेतल्या. याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर व सर्वच सहकाऱ्यांच्या सेवेबाबत तसेच एकंदरीतच कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात औषध व इंजेक्शनचा तुटवडा निर्माण भासत असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना गुरुवारी पत्रकारांनी दिली होती. त्यानंतर राजन तेली यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधत माहिती जाणून घेत औषधांचा तुटवडा दूर करावा अशी मागणी केली होती.
त्यानंतर शुक्रवारी अचानकपणे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धडक दिल्यामुळे ही भेट विशेष महत्त्वाची ठरली.
मात्र, ‘जागरूक पालक, सुदृढ बालक ‘ अभियानांतर्गत ही आपली भेट असून आज अचानकपणे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी प्रसूती कक्षातील मातांशी थेट संवाद साधत रुग्णालयात त्यांना मिळणाऱ्या सुविधा, औषधोपचार, जेवण, गरम पाण्याची व्यवस्था याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी सर्वच मातांनी या सेवांबाबत समाधान व्यक्त केले. महिला रुग्ण विभागातही भेट देऊन त्यांनी महिला रुग्णांकडून विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कार्यालयीन कामकाज व लेबर रूम याचीही पाहणी करत कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
त्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याकडून कार्यालयीन कामकाज तसेच उद्भवणाऱ्या समस्या व अन्य बाबींबाबत आढावा घेतला. यावेळी डॉ. दुर्भाटकर यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच तंत्रज्ञांच्या रिक्त पदांबाबत माहिती देत ही पदे भरण्याची विनंती केली. त्यावेळी शासन याबाबत अनुकूल असून लवकरच ही पदे भरण्यात येतील अशी माहिती डॉ. कांबळे यांनी दिली.
Sindhudurg