कोकणचा आंबा आपणच नासवतोय…!
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा पुणे-बेंगलोर महामार्ग या महामार्गांवर जागो-जागी आंबे विक्रीचे स्टॉल आहेत. कधी-कधी या महामार्गांवरून फिरताना कोकणच्या लोकांनाही आश्चर्य वाटावे अशी स्थिती होते.
जेव्हा कोकणातील हापूस आंबा देवगड, विजयदुर्ग, वेंगुर्ले, मालवण या आंबा होणाऱ्या भागामध्ये विक्रीला नसतो तेव्हा महामार्गावर एवढा आंबा विक्रीला कसा काय आणि कुठून आंबा येतो.मग लक्षात येत की आंबा कर्नाटकचा, बॉक्स देवगड हापूसचा .आतमध्ये पॅकिंगसाठी वापरला जाणारा कागद कोकणातील वृत्तपत्रांच्या रद्दीचा वापरला जातो.
फार नियोजनबद्ध ग्राहकांची फसवणुक केली जात आहे. खुल्या बाजारपेठा यामध्ये कोणीही कुठेही विकावं त्यामुळे कर्नाटकचा हापूस देवगड हापूस म्हणून विकला जातो. त्यावर आंबा बागायतदार काहीही करण्याच्या मानसिकतेत नाहीत. परंतु यामुळे काय होतय की देवगड हापूस ऐवजी कर्नाटकचा आंबा ग्राहकांकडे जातोय.
यामुळे कर्नाटक हापूसची जी काही टेस्ट असेल ती ग्राहकांपर्यंत जाते. कोकणातील आंबा बागायतदार आजही रूमालाच्याखालून होणाऱ्या मार्केटमधील व्यवहारावरच अवलंबून आहे. कोरोना नंतर एक गोष्ट घडली की आंबा विक्रीच मार्केट बदललय. कोरोनाकाळात नागपूर, बारामती, कोल्हापूर, पुणे, नागपूरकडचे व्यावसायिक थेट आंबा बागायतदारांच्या बागायतींमध्ये येऊन आंबा खरेदी करू लागले.
यामुळे बागायतदारांना चांगला दर मिळाला मात्र ही विक्री व्यवस्था पुढे तशीच चालू रहाण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे होते. यासाठी बागायतदारांनीही आंबा विक्री करताना गुणवत्तेची तडजोड करता कामा नये परंतु तस काही होत नाही. बऱ्याचवेळा पेटी भरताना वरचा थर चांगल्या आंब्यांचा आणि तळाला कोवळा आंबा भरला जातो.
यामुळे ही होणारी फसवणुक शेवटी आंबा व्यवसायावर अविश्वासच निर्माण करणारी आहे. क्षणिक पैशांच्या लोभापायी ही जी काही फसवणुक केली जातेय त्यामुळे आंबा विक्री व्यवस्थेत कोकणातील आंबा बागायतदार बदनाम होतोय याची जाणीव आणि भान सतत राखल गेलं पाहिजे. सहज आठवल म्हणून सांगतो जवळपास तीस वर्षापूर्वीची मुंबईच्या क्रॉफर्डमार्केटमधील ही घटना आहे. मी एप्रिल महिन्यात असाच कशातरी कामानिमित्ताने मुंबईत गेलेलो सहज फिरत-फिरत क्रॉफर्ट मार्केटमध्ये जाणं झालं. आमचे मित्र मंगलगाणी दंगलगाणी, मराठी बाणा या कार्यक्रमाचे निर्माता गायक आणि पिढीजात या आंबा व्यवसायात असणारे अशोक हांडे यांची भेट झालेली त्यावेळी आंबा दलाल आणि आंबा बागायतदार शेतकरी त्यांचे प्रश्न या अनुषंगाने मी अशोक हांडे यांच्याशी बोलत होतो. अशोक हांडे यांनी मला तेव्हा म्हणाले दहा मिनिट तुला प्रत्यक्ष काय स्थिती आहे ते दाखवतो. मग ठरव आंबा दलाल आणि आंबा बागायतदारांनी काय करायला पाहिजे ते तूच ठरव.
देवगड भागातून सकाळीच आलेल्या बागायतदारांच्या अशोक यांनी चार पेट्या उघडल्या यातल्या एका पेटीत फक्त वरचा थराला मोठे पिकण्यासाठी योग्य आंबे होते. तळाचे दोन्ही थर हे कोवळे बारीक आंबे होते. मला अशोक हांडे म्हणाले, अरे आता याला कितीची पट्टी काढायची मी हे पहात होतो. पुढच्या पाचच मिनिटात देवगड, वाडातरच्या अ.मो.जोशी या नावाने आलेली आंबा पेटी उघडली गेलील जो आंबा वरच्या थराला होता त्याच गुणवत्तेचा आंबा शेवटच्या थराला होता.
ती आंबा पेटी होती. देवगडातील सुप्रसिद्ध आंबा बागायतदार सुधीर जोशी यांची ती पेटी होती. मला अशोक हांडे म्हणाले,आंब्यामधला हा फरक रहातो. पंचवीस-तीस वर्षापूर्वीची ही घटना क्रॉफर्ड मार्केटमधला हा अनुभव एवढ्याचसाठी सांगितला तेव्हा कल्टारची सुरूवात होती. कोकण कृषी विद्यापिठाचे डॉ. गुंजाठे आंबा बागायतदारांनी कल्टार वापरण्यासाठी सांगत होते. कल्टारने नेमक काय बिघडवल आणि कल्टारने आंबा बागायतदार शेतकऱ्यांना किती पैसे मिळवून दिले हे बागायतदार शेतकरीच सांगू शकतील.
कल्टारला विरोध करणारेही तेव्हा कै. सत्यवान जामसंडेकर यांच्यासारखे बागायतदार शेतकरी होते. शेती बागायती या अलिकडच्या काही वर्षात निसर्गावर अवलंबून राहिली आहे. या निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बागायतदार शेतकरी आणि मच्छिमारांनाही बसत आहे. यामुळे एकिकडे निसर्गाची बेभरवशी म्हणता येईल अशी स्थिती असताना बागायतदार शेतकऱ्यांनी फार काळजीपूर्वक आंब्याच मार्केट जपल पाहिजे. परंतु दुर्दैवाने असं घडत नाही. ते जपण्यासाठी कोणतेही प्रयत्न संघटीतरित्या होत नाहीत. त्यावर चर्चाही करण्याची कोणाचीही मानसिकता नाही. एकदा कोकणच्या हापूसची बदनामी झाली तर आंबा विक्री मार्केटमध्ये कोकणातील आंबा घेण्यासाठी ग्राहक आंबा घेणार नाही. आज गुजरात, कर्नाटकमधून बाराही महिने आंबा येतोय. यामध्ये आपण कुठेच बसत नाही. त्यामुळे आपण आपल्या कोकणच्या हापूस आंब्याची मिजास न दाखवता ग्राहकाला जपला पाहिजे.
क्षणिक फायद्यासाठी आंबा विक्री मार्केट खराब केलं जाता कामा नये. राजापूर भागातही आंबा विक्री थेट कंपन्यांना केली जात होती. कंपनीने खरेदीची तयारी दाखवली. दरही चांगला दिला गेला. परंतु बागायतदार शेतकऱ्यांनी कोवळे आंबे पाठवले. शेवटी कंपनीने खरेदी व्यवस्था बंद केली. चारपैसे अधिकचे मिळणारी ही व्यवस्थाच कोलमडून टाकण्याचा करंटेपणा काही आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी केला. शेवटी जाता-जाता एवढच म्हणने कोकणच्या हापूस आंब्याची असलेले एक स्थान जाता कामा नये. ते स्थान अव्वलस्थानीच रहायच असेल तर कोकणातील सर्वच आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आंब्याची गुणवत्ता कायम राखली पाहिजे. अन्यत: कर्नाटकचा आंबा फळांचा राजा म्हणून मार्केटमध्ये अव्वलस्थानी दिसला तर नवल वाटायला नको.













