मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्याचे सुपुत्र, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जागतिक विद्वान आणि थोर मानवतावादी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंतीनिमित्त शिक्षण विभाग पंचायत समिती मंडणगड यांच्या वतीने अनोखी मानवंदना देण्यात आली.
स्वतःस आजन्म विद्यार्थी असे संबोधन देणाऱ्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या अलौकिक आणि विशाल व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू समाजात विशेषतः विद्यार्थी वर्गात प्रचारित व्हावे या उद्देशाने मंडणगड तालुक्याचे गटविकास अधिकारी विशाल जाधव व गटशिक्षणाधिकारी एन.के शिंदे यांच्या पुढाकाराने प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत सदर स्पर्धा शाळा, केंद्र, प्रभाग, (बीट) आणि तालुका अशा स्तरावर आयोजित करण्यात आल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण,संघर्षमय शिक्षण प्रवास, घटनेचे शिल्पकार ,संविधानातील मूलभूत अधिकार, जीवन कार्य अशा विविध विषयांवर आधारित निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या व्यापक व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतून आपल्या व्यक्तिमत्वातील कौशल्याचे प्रदर्शन करता आल्याने विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांची ही जयंती एक पर्वणी ठरली.
तालुकास्तरावरील वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृह मंडणगड येथे बाबासाहेबांच्या जन्मदिनी १४ एप्रिल रोजी संपन्न झाल्या. तालुकास्तरावरील अंतिम विजेत्या विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी विशाल जाधव आणि गटशिक्षणाधिकारी एन.के. शिंदे यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत, सन्मानपत्र (प्रशस्तीपत्रक) आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेवून आपले व्यक्तिमत्व आणि जीवन समृद्ध करावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोर आदर्श समोर ठेवावा असे आवाहन गटविकास अधिकारी श्री विशाल जाधव यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.शिंदे म्हणाले की,मंडणगड तालुका हा बाबासाहेबांची मायभूमी असल्याने जागतिक पटलावर या तालुक्याला एक ऐतिहासिक वारसा आणि वलय आहे, त्यांच्या मानवीय आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेत मंडणगड मधील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरत समाज आणि राष्ट्र उभारणीत आपली निर्णायक भूमिका घ्यायला हवी असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीकांत जाधव यांनी तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख श्री. जगताप यांनी केले.












