खेड (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी येथील प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर जावू न शकणाऱ्या व घरबसल्या मतदान करू इच्छिणाऱ्या ४६१ मतदारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
खेड तालुका दापोली व गुहागर विधानसभा मतदार संघात विभागला गेला आहे. दोन्ही विभागातील १९४ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये दापोली संघात १०४ व गुहागर संघात ९० केंद्रांचा समावेश आहे. तालुक्यात कर्मचाऱ्यांमार्फत झालेल्या सर्व्हेत आतापर्यंत दिव्यांग व ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशा ३२०८ मतदारांची नोंद झाली आहे. यातील ४६१ मतदार मतदान केंद्रांवर जाण्यास असमर्थ असल्याने त्यांना टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघात २७ दिव्यांग व ८५वरील २५४ मतदार, तर गुहागर विधानसभा मतदार संघात १२ दिव्यांग व पंच्याऐंशीवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये १६८ मतदारांचा समावेश आहे.










