राजापूर (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तालुक्यातील बहुतांश काम पूर्ण होवून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, रस्त्याच्या कामामध्ये अद्यापही अनेक त्रुटी राहिल्याने त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. विशेषतः स्ट्रीट लाईट बंदस्थितीमध्ये असल्याने त्याचा लोकांना नाहक त्रास होत होता. बंदस्थितीतील ही स्ट्रीट लाईट सुरू व्हावी यासाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी सातत्याने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. शुक्रवार सायंकाळपासून अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीचा पूल ते एसटी डेपोसमोरील पूल या परीसरातील स्ट्रीट लाईट अखेर अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सुरू झाल्या असून त्याच्या प्रकाशामध्ये महामार्ग उजळून निघाला आहे.
महामार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण विभाग, महामार्ग ठेकेदार कंपनी, ग्रामस्थ, स्थानिक ठेकेदार दिनेश जावकर यांच्यासह सहकार्य करणाऱ्या सर्वांना श्री. लांजेकर यांनी धन्यवाद दिले आहेत. महामार्गावरील उर्वरीत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आगामी काळात प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्यातून गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. रस्त्याच्या पूर्ण झालेल्या कामामुळे गाड्यांना भरधाव वेगाने आणि सुरक्षितपणे मार्गक्रमण करणे आता अधिक सोयीचे अन् सुलभ झाले आहे. मात्र, दुसर्या बाजूला महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी, रस्त्याच्या कामामध्ये अनेक ठिकाणी त्रुटी राहीलेल्या आहेत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. एस.टी. डेपोच्या बाहेर रस्त्यावर पिकअपशेड नसल्याने प्रवाशांना ऊन-पावसामध्ये उभे रहावे लागत आहे. शेताकडे जाणार्या पायवाटांमध्ये माती टाकलेली असल्याने शेतकर्यांचा शेताकडे जा-ये करण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही ठिकाणचे सर्व्हिस रोडचे काम रखडलेले आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणचे स्ट्रीट लाईट गेल्या काही महिन्यांपासून बंदस्थितीमध्ये आहेत.
याचा सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री. लांजेकर यांनी प्रजासत्ताक दिनादिवशी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाकडून बंदस्थितीमध्ये महामार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू करण्याचे आश्वासित करीत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार उपोषण तात्पुरत्या काळासाठी स्थगित केले होते. त्यानंतर, सातत्याने प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला यश येताना बंदस्थितीतील स्ट्रीट लाईट अखेर शुक्रवार सायंकाळपासून सुरू झाली आहे. त्याबद्दल श्री. लांजेकर यांना ग्रामस्थांसह वाहन चालक आणि प्रवाशांकडून धन्यवाद दिले जात आहे.










