खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील बचतगटांच्या महिलांना शासनाकडून सवलतीच्या दरात शिलाई मशिनसह घरकुलाचे आमिष दाखवून ९३८ महिलांची तब्बल २३ लाख रूपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बबन मारूती मोहिते (रा. वाराणी-कासार, बीड) याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फसवणूक प्रकरणातील त्याने मुख्य सूत्रधाराकडून घेतलेली काही रक्कम हस्तगत करण्याचे येथील पोलिसांसमोर मोठे आव्हानच असून तपास सुरू आहे.
महाराष्ट्र क्रांती सेना संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवत संदीप शंकर डोंगरे (रा. वाराणी-कासार, बीड) याने बबन मोहिते याच्या सहाय्याने बचतगटातील महिलांना विविध योजनांची आमिषे दाखवत तब्बल २३ लाख रूपये उकळून पोबारा केला होता. रक्कम देवूनही शिलाई मशिन, घरकुले व घरघंटी न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बचतगटातील महिलांनी पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली होती.
पोलीस निरीक्षक यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य सूत्रधार असलेल्या संदीप डोंगरेला शिताफीने गजाआड करत प्रकरणाचा छडा लावला होता. मात्र या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेला बबन मोहिते हा गेल्या १० महिन्यांपासून फरारी होता. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने मुंबई येथून जेरबंद करत येथील पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता संदीप डोंगरे यांच्याकडून ४ ते ५ वेळा फसवणुकीतील रक्कमेचा हिस्सा घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र या रक्कमेचे नेमके काय केले, हे त्याने अद्याप पोलिसांना सांगितले नसल्याचे समजते. यामुळे त्याच्याकडून फसवणुकीतील रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही येथील पोलिसांकडून पडताळा करण्यात येत आहे. त्याच्याकडून आणखी काही धागेदोरे मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.











